प्रतिनिधी, बुलढाणा : सर्वोच्च न्यायालयाच्या बहुमत चाचणी न रोखण्याच्या निर्णयानंतर लगेचच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा आणि विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले असून आता भारतीय जनता पक्षाला सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला. यामुळे भारतीय जनता पक्षाच्या गोटात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात भाजप नेत्यांनी एकमेकांना पेढे भरवून हा आनंद साजरा केला. उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर भाजपच्या गोटात आनंदाची लाट उसळली. या निर्णयानंतर भाजपच्या प्रत्येक नेत्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. सर्व भाजप नेते चेहऱ्यावर हास्य आणून एकमेकांना पेढे भरवितांना पाहावयास मिळाले. खामगावात भाजपा नेते सागर फुंडकर यांच्या नेतृत्वात आनंदोत्सव साजरा करण्यात आलं.
