प्रतिनिधी , मुंबई : महाराष्ट्रात कोरोना विषाणूंचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नाने मरिला डिस्कव्हरी या एका मोठ्या जहाजावर महिनाभरापासून अडकलेल्या १४६ भारतीय खलाशी आणि नाविकांना मुंबईच्या बंदरावर उतरण्याची परवानगी मिळाली आहे.
मुख्यमंत्र्यांनी स्वत: नौकानयन राज्यमंत्री मनसुख मांडविया यांच्याशी चर्चा केल्यानंतर काल (२१ एप्रिल) ला रात्री केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबतचा एक आदेश निर्गमित केला. यामुळे मरिला डिस्कव्हरी क्रुझवर अडकलेल्या १४६ खलाशी आणि नाविकांची सुटका झाली. विशेष म्हणजे याचा फायदा समुद्रात ठिकठिकाणी जहाजांवर अडकलेल्या सुमारे ४० हजार खलाशी, जहाजावरील कर्मचाऱ्यांना सुद्धा होणार आहे.
ही क्रुझ मुंबईजवळच्या समुद्रात १४ एप्रिल रोजी पोहचली होती. मात्र तेव्हापासून त्यावरील कर्मचारी मुंबईत उतरण्याची परवानगी मागत होते. जहाजावरील कुठल्याही कर्मचाऱ्यास कोरोना लागण झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. थायलँड सोडून ३७ दिवस होऊन गेले होते, मात्र जहाजावर कुठलाही संसर्ग नसल्याचे कंपनीने सागितले. तरी परवानगी मिळत नव्हती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात नौकानयन मंत्रालयाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती.
