जनतेज न्युज

मुळा पाणी प्रश्नी 14 जुन पासून किसान सभेचा सत्याग्रह – डॉ. अजित नवले

प्रतिनिधी, अहमदनगर :

मुळा खोऱ्यातील पाण्याचे समन्यायी पुनर्वाटप करून अकोले विधानसभा मतदार संघातील आदिवासी व बिगर आदिवासी जनतेला शेती व पिण्यासाठी पाण्याचा रास्त वाटा द्या, हिरड्यांची सरकारी खरेदी सुरू करा, कोतुळ आंदोलनात मान्य केलेल्या रस्त्यांची कामे तातडीने सुरू करा, तोलार खिंड फोडून परिसराला मुंबई बाजारपेठेशी जोडा, शेती व वस्तीसाठी वीज द्या या प्रमुख मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने 14 जून रोजी कोतुळ येथील मुख्य चौकात सत्याग्रह सुरू करण्यात येत आहे.

पिंपळगाव खांड धरणाच्या पाण्याबाबत कोतुळ खोऱ्यात संघर्ष सुरू आहे. आंदोलक आपल्या परिसरातील जनतेची बाजू घेऊन संघर्ष करत आहेत. पिंपळगाव खांड धरणात साठलेले ओंजळभर पाणी वाटण्यावरून परिसरात तणाव आहे. मुळा धरणाच्यावर हरीश्चंद्र गडाच्या पायथ्यापर्यंत पाण्याचा साठा अत्यल्प आहे. मुळा खोऱ्यातील सर्व पाणी मुळा धरणात प्रामुख्यानं साठवण्यात येऊन मुळा धरणाच्या खाली शेतीला व शहरांना हे पाणी पुरवले जात आहे. खोऱ्यातील बहुतांश पाणी मुळा धरणात साठवल्यामुळे मुळा धरणाच्या वरील भागातील अकोले व संगमनेर तालुक्यातील शेतकरी पाण्यापासून वंचित राहिले आहेत. 14 जून रोजी सुरू होणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी 15 जून रोजी किसान सभेच्या वतीने कोतुळ येथे भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.