प्रतिनिधी , औरंगाबाद : रमजानच्या चंद्राचे शुक्रवारी (ता.२४) संध्याकाळी दर्शन झाल्याने शनिवारी (ता.२५) पहिला रोजा राहणार आहे. लॉकडाऊनमुळे सर्वजण घरातच अडकून पडले आहेत. त्यामुळे कुणालाही गळाभेट घेऊन चाँद मुबारक अशा शुभेच्छा देता आल्या नाही. सर्वांनाच रोजा ठेवल्यानंतर पाच वेळच्या नमाजसह ‘तरावीह’ची विशेष नमाजसुद्धा घरातच अदा करावी लागेल. सर्वांना घरातच नमाज अदा करण्याचे आवाहन अगोदरच मौलवींनी केले आहे.
रमजानमध्ये ‘तरावीह’ची नमाज रात्रीच्या ‘ईशा’च्या नमाजनंतर अदा केली जाते. विशेष ‘नमाज तरावीह’मध्ये महिनाभर कुराण पठण केले जात असल्याने सर्व मशिदीत गर्दी असायची. मात्र, यावेळी मशिदीत सर्वसामान्यांना येण्यास मनाई करण्यात आली आहे.
बोहरा समाजाचा गुरुवारीच पहिला रोजा
सौदी अरेबियासहित भारतातील केरळ आणि कर्नाटकमध्ये शुक्रवारी रमजानचा पहिला रोजा होता; तसेच औरंगाबाद शहरात दाऊदी बोहरा समाजाचा गुरुवारी (ता.२३) पहिला रोजा होता. शुक्रवार त्यांचा दुसरा रोजा होता. बोहरा समाजातर्फेसुद्धा घरातच नमाज अदा करण्याची सूचना देण्यात आली आहे.
