जनतेज न्युज

लॉकडाऊन : राज्य सरकारकडूनही १७ मेपर्यंत लॉक डाऊनसाठी अधिसूचना जारी

प्रतिनिधी , मुंबई : देशभरातील लॉकडाउन १७ मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केंद्र सरकारनं शुक्रवारीच केली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारनं एक पत्रक जारी केलं आहे. ३ मे रोजी लॉकडाउनचा दुसरा टप्पा पूर्ण होणार होता. त्यापूर्वीच पुन्हा एकदा लॉकडाउन वाढवण्याची घोषणा सरकारनं केली आहे. या लॉकडाउन दरम्यान रेड झोनमधील कोणत्याही भागांना सवलत देण्यात येणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. त्यानंतर आज राज्य सरकारकडून एक अधिसूचना जारी करून राज्यातही १७ मेपर्यंत वाढवण्यात आल्याचे घोषित केले आहे. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी हे आदेश जारी केले आहे.

गृह मंत्रालयानं दिलेल्या निर्देशानुसार राज्य सरकारने लॉकडाउन वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे अनावश्यक वस्तूंच्या विक्रीवर कोणतेही बंधन राहणार नाही, सलूनची दुकानेदेखील या भागात उघडण्यास परवानगी आहे. ग्रीन झोनमध्ये बससेवा सुरू करण्यात येईल. मात्र या बसेस ५० टक्के क्षमतेनंच चालवल्या जातील. बस आगारांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचारी नसतील. ऑरेंज झोनमधल्या बससेवा सुरू केल्या जाणार नाहीत. मात्र या भागांमध्ये कॅब सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कॅबमध्ये चालकासोबत केवळ एकच प्रवासी असेल. ऑरेंज झोनमधल्या औद्योगिक सेवा सुरू होतील. औद्योगिक संकुलंदेखील सुरू करण्यास परवानगी दिली गेली आहे. मात्र रेड झोनमधील निर्बंध कायम राहतील. या ठिकाणी असलेली दुकानं सुरू होणार नाहीत. केवळ जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकानं खुली राहतील.

दरम्यान, हा लॉकडाउन लागू करताना सरकारनं ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये सशर्त सवलती देण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. परंतु रेड झोनमध्ये कोणतीही सवलत देण्यात येणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट करण्यात आलं आहे. रेड झोन, ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन्ससाठी गृहमत्रालयानं काही नव्या गाईडलाइन्सही जारी केल्या आहेत. ग्रीन झोन्समध्ये करोनाचा एकही रुग्ण नाही किंवा २१ दिवसांमध्ये करोनाचा एक नवा रुग्ण सापडला नाही, अशा भागांचा समावेश करण्यात आला आहे. तसंच ज्या जिल्ह्यांचा समावेश रेड किंवा ग्रीन झोनमध्ये नसेल ते जिल्हे ऑरेंज झोनमध्ये सामिल करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.