प्रतिनिधी , पुणे : राज्यात कोरोना (Corona) संसर्गामुळे चार महिने लॉकडाऊन झाले. या काळात असंख्य नागरिकांवर उपासमारीची वेळ आली. राज्य सरकारने सर्व बाबी पुन्हा लवकर सुरू कराव्या. जातीचा मोठा नेता कोणीही होऊ शकतो, धर्माचा नेताही होऊ शकतो. मात्र, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता योग्य निर्णय घेऊन लोकांचा नेता होऊन दाखवावं, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वाधित संसर्ग असलेल्या भागांना हॉटस्पॉट म्हणून घोषित केलं आहे. मात्र, राज्य सरकारने हॉटस्पॉट घोषित केलेल्या भागांमध्ये यावर्षापेक्षा गेल्यावर्षी म्हणजेच २०१९ साली जास्त लोकांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य विभागाची ही माहिती आहे. त्यामुळे राज्य सरकारने पूर्णपणे लॉकडाऊन हटावावा आणि खऱ्याअर्थाने अनलॉक करावा. अन्यथा आम्ही १० ऑगस्टनंतर कधीही रस्त्यावर उतरुन कायदा हातात घेऊ, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला.
पुण्यात गेल्यावर्षी मे महिन्यात ४,००७ मृत्यू झाले, यावर्षी मे महिन्यात १,६०५ मृत्यू झाले. मुंबईमध्ये मागच्यावर्षी ३,०४६ मृत्यू झाले, तर यावर्षी २,८६० मृत्यूंची नोंद झाली. केंद्र सरकारच्या विभागाकडून ही माहिती मिळाल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं. तसंच यावर्षी कोरोनामुळे किती मृत्यू झाले आणि इतर कारणामुळे किती मृत्यू झाले याची आकडेवारी सरकारने द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
राज्यात महापुराचं संकट येऊ घातलंय, कोविड कोविड करत बसण्यापेक्षा महापुराच्या प्रश्नाकडे कधी लक्ष देणार? ५ टक्के लोकांना अधिक धोका आहे, असं असताना ९५ टक्के लोकांना वेठीला का धरता? असा सवालही आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. कोरोनाच्या काळात परीक्षा न घेता पास करणं चुकीचं आहे. कोविडमुळे पास झाला, असे व्हायला नको. यावर्षी नाही, पुढच्यावर्षी परीक्षा घ्या, पण घ्या, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
