जनतेज न्युज

शहादा तालुक्यातील शिरुड येथे अफूची शेती, मक्याच्या शेतात फुलवला अफू….

प्रतिनिधी , नंदुरबार : शहादा तालुक्यातील अतिदुर्गम भागात सात एकर शेतात छुपेपणाने अफूची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलिसांना माहिती मिळाल्या नंतर त्या पिकाची मोजणी करणे काम चालू आहे.
बाजार भावाने त्याची रक्कम कोटीच्या घरात असू शकते असे जाणकारांचे म्हणणे आहे. पिकाची पूर्ण मोजणी झाल्याशिवाय किंमत सांगता येणार नाही व हे काम 2 दिवसात पूर्ण होईल, असे तपास अधिकारी यांचे म्हणणे आहे. प्राप्त माहितीनुसार उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे यांना काही शेतकऱ्यांनी अफूची शेती केली असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.म्हणून म्हसावद शिवारातील शिरुड गावात शहादा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दीपक बुधवंत, म्हसावद पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक किरण पवार व अन्य काही अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पथकांनी छापा टाकला. आजूबाजूला मका पेरलेला आणि शेतीच्या मध्यभागात अफूचे पीक आढळून आले. सुमारे साडेसात एकरात अफूची शेती करण्यात येत असल्याचा प्रकार यामुळे उघडकीस आला.शिरुड तर्फे हवेली हे गाव अतिदुर्गम भागात तोरणमाळ रस्त्याला म्हसावद पासून आठ किलोमीटर अंतरावर आहे. बाहेरून आलेल्या काही मेंढपाळ लोकांनी ही शेती भाडेकराराने घेतली असून त्यात त्यांनी अफूची लागवड केल्याचे प्रथम दर्शनी समोर आले. खरोखर लागवड केलेला अफू किती प्रमाणात आहे याचीही मोजणी सायंकाळी उशिरापर्यंत चालली. दरम्यान अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार यांनी अफुची शेती असलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली . परंतु अद्याप गुन्हा नोंद करणे बाकी असल्याचे यावेळी सांगण्यात आले…..