प्रतिनिधी, वर्धा : अंशदायी पेन्शन योजना एनपीएस रद्द करून सर्वांना जुनी परिभाषित पेन्शन योजना लागू करा, सर्व विभागांतील रिक्त पदे कायमस्वरूपी भरा, समान कामास समान वेतन या न्यायानुसार कंत्राटी व रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा त्वरित नियमित करा, यासह विविध मागण्यांकरिता आज सरकारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचारी महासंघाने २७ मे हा दिवस मागणी दिन पाळण्याचा निर्णय घेतला.त्या अनुषंगाने वर्धा जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये भोजनाच्या सुट्टीत कार्यालयासमोर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचारीनी निदर्शने केली. सर्व राज्य कर्मचाऱ्यांनी हा मागणी दिन पाळून शासनाचे लक्ष वेधावे, असे आवाहन राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष एच.एम. लोखंडे व सरचिटणीस विनोद भालतडक यांनी केले.
