प्रतिनिधी , मुंबई : कोरोना व्हायरसच्या अचानक उद्भवलेल्या संसर्गामुळे राज्यातील आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यामुळे मार्च महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार दोन टप्प्यांत देण्यात आला होता; पण एप्रिल महिन्यात सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार एका टप्प्यात आणि वेळेत दिला जाणार आहे. राज्य सरकारने नुकताच याबाबतचा आदेश काढला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा पगार दोन टप्प्यांत देण्यात आला होता. मात्र आता एप्रिलचे वेतन नियमित पद्धतीने एकाच टप्प्यात देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार सर्व विभागांना सूचित करण्यात येते की, त्यांना त्यांची वेतन देयके नेमून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे वेळीच कोषागारात सादर होतील हे पाहावे, जेणेकरून कोषागारांनादेखील मर्यादित मनुष्यबळाच्या आधारे त्यावर वेळीच कार्यवाही करणे शक्य होईल, असेही यात म्हटले आहे.
सर्व अनुदानित संस्था, विद्यापीठे, सार्वजनिक उपक्रम, महामंडळे आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनादेखील एप्रिलचा पगार वेळेवर देण्यास शासनाची हरकत नाही, असेही यात नमूद करण्यात आले आहे.
