प्रतिनिधी , पुणे : कोरोना विषाणुचा फैलाव रोखण्यासाठी देश, राज्ये युद्धस्तरावर प्रयत्न करत आहेत. कोरोनाने संपुर्ण जगाला ग्रासले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. लोकांना घरात बसण्याचे कळकळीचे आवाहन करण्यात येत आहे.
मात्र, काही लोकांना घरातही स्वस्थ बसवत नसल्याने कोरोना संदर्भात नाना त-हेचे मेसेज सोशल मीडियावरून व्हायरल करताना दिसत आहेत. चुकीचे मेसेज, खोटी माहिती पसरवणा-या, व्हायरल होणा-या मेसेजेसवर पोलिसांची करडी नजर असून अनेंकावर गुन्हादेखील दाखल झाला आहे. त्याचप्रमाणे, उद्या 1 एप्रिल आहे. याच पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.
“जर कुणी कोरोना विषाणू संबंधित एप्रिल फूल केले तर मेसेज करणाऱ्यावर आणि अॅडमिनवर गुन्हे दाखल केले जाणार आहे”, असा इशारा पुण्याचे सह पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे यांनी दिला आहे.
“देशावर, संपुर्ण जगावर कोरोना विषाणूचे मोठे संकट आले असताना गांभीर्याने या संकटाचा सामना करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे 1 एप्रिलला कोरोना विषाणू संदर्भात कोणत्याही प्रकारचे संभ्रम निर्माण करणारे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल करू नये”, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
“नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन संचारबंदीचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. यासंदर्भात ग्रुप ॲडमिनने आताच आपल्या ग्रुपमधील सर्व सदस्यांना याबाबत सूचना द्याव्यात. त्याचबरोबर सेटिंगमध्ये जाऊन फक्त ग्रुप ॲडमिन मेसेज सेंड करेल अशी सेटिंग करावी”, असं आवाहनही शिसवे यांनी केलं.
“कोरोना विषाणू संदर्भात व्हॉट्स्अॅपवर मोठ्या प्रमाणात वेगवेगळे मेसेज पाठवले जातात. त्यामुळे अनेक अफवा पसरल्या जात आहेत. असे मेसेज पाठवणाऱ्यांना अटक आणि दंडाची शिक्षा असल्याचे शिसवे म्हणाले.” त्यामुळे नागरिकांनी वेळीच सावध होऊन समाजात संभ्रम निर्माण होणार नाही असे मेसेज पाठवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
