जनतेज न्युज

‘हिंदूत्व विसरलेल्या शिवसेनेला राजकिय किंमत मोजावीच लागेल’, असंख्य शिवसैनिक भाजपात

प्रतिनिधी , रत्नागिरी : सत्तेच्या लोभापायी शिवसेनेला हिंदूत्व आणि सामाजिक बांधिलकीचा विसर पडलेला आहे, शिवसेनेला याची राजकीय किंमत मोजावीच लागेल, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शिवसेनेवर (Shivsena) केली आहे. खेड तालुक्यातील भाजपा (BJP) मेळाव्यात शेकडो शिवसैनिकांनी प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्रविण दरेकर म्हणाले की, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने सतत धर्मनिरपेक्ष सरकार असल्याचं म्हणत हिंदूंशी दुजाभाव केला, अयोध्येतील विवादीत बांधकाम पाडण्यात पुढाकार घेणाऱ्या बाळासाहेबांची शिवसेना आता शिल्लक राहिली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) याना अयोध्येत शरद पवार (Sharad Pawar) जाऊ देतील का? असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला. राम मंदिराच्या भूमीपूजनालाही विरोध करुन कोरोनाशी परिस्थिती पाहता ई-भूमीपूजन करण्यात यावं असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला होता. हिंदूत्वाशी तडजोड करत असल्याच्या कारणावरुन या शिवसैनिकांनी जय महाराष्ट्र करत भाजपात प्रवेश केला, असा दावाही त्यांनी केला.

तसेच देशात ४ महिन्यांहून अधिक काळ होऊनही महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचा कहर आहे. राज्यात वाढणारी कोरोनाग्रस्तांची संख्या चिंताजनक आहे. कोकणात निसर्ग चक्रीवादळामुळे अनेकांचे नुकसान झाले, त्या पीडितांनाही नुकसाई भरपाई मिळाली नाही. दूध उत्पादकांचा प्रश्न तसाच आहे, शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा भासत आहे. मात्र या सर्व गोष्टींकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप दरेकर यांनी केला.