प्रतिनिधी , मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा वाढत असतानाच मुंबईत कोरोनाचा मुकाबला राज्य सरकार कसे करत आहे याची पाहणी करण्यासाठी आलेल्या पाच सदस्यीय पथकाने स्वत:सोबत काही अंदाज दर्शवणारी आकडेवारी आणली होती. त्यानुसार ३० एप्रिलपर्यंत एकट्या मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या ४२,६०४ होणार आहे तर हीच संख्या १५ मेपर्यंत ६,५६,४०७ पर्यंत जाईल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे. याबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी वारंवार संपर्क साधला; पण त्यांनी काहीही सांगितले नाही. केंद्राच्या पथकाने धारावीत बोलताना परिस्थिती गंभीर आहे, यापेक्षा जास्त आम्ही काही बोलू शकत नाही, असे उत्तर दिले आहे.
ही बातमी पण वाचा : जगभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या २३,९७,२१६; भारतात १९ हजार ९९५
मिळालेल्या माहितीनुसार ज्या गतीने मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, त्यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दोन खाजगी संस्थांकडून महाराष्ट्रात काय परिस्थिती होऊ शकते याचा अंदाज घेतला आहे. हा अंदाज गणिती पद्धतीने काढण्यात आला आहे. १६ एप्रिल रोजी जी आकडेवारी अधिकृत उपलब्ध होती त्याचा आधार घेत हा अंदाज वर्तवण्यात आला आहे; शिवाय रुग्णसंख्या ३.८ दिवसांनी डबल होत आहे, अंदाजे एकत्रित वाढ २० टक्के आणि उपलब्ध साधनसामग्री यांचा आधार यासाठी घेण्यात आला आहे. या कथित अहवालामुळे राज्यात व मुंबईकरांमध्ये पॅनिक परिस्थिती निर्माण होत असताना दिवसभरात राज्य सरकारने, सार्वजनिक आरोग्य विभागाने अथवा मुंबई महापालिकेने याविषयीचा कोणताही खुलासा न केल्यामुळे त्यांची या अहवालास मूक संमती आहे, अशी चर्चा सुरू आहे.
त्यातून मुंबईच्या अस्वस्थतेत भरच पडली आहे. या अंदाजानुसार ३० एप्रिलपर्यंत विना ऑक्सिजनचे ३०,४८१ आयसोलेशन बेड कमी पडतील. जर वेळीच यावर उपाय केले गेले नाहीत तर १५ मे रोजी असे ४,८३,३८५ आयसोलेशन बेड कमी पडतील असे अंदाजात म्हटले आहे. ऑक्सिजनसह असणारे आयसोलेशन बेड ३० एप्रिलपर्यंत ५,४६६ तर १५ मेपर्यंत ८४,९३२ आयसोलेशन बेड कमी पडतील. आयसीयू बेडदेखील कमी पडणार आहेत. ३० एप्रिलपर्यंत १२०० तर १५ मेपर्यंत २७,६८८ आयसीयू बेड कमी पडणार आहेत. आपल्याकडे व्हेंटिलेटर भरपूर आहेत, असा दावा आरोग्यमंत्री राजेश टोपे करत असले तरी ३० एप्रिल रोजी ३९२ तर १५ मे रोजी १३६३ व्हेंटिलेटर कमी पडतील, असेही या अहवालात नमूद केले आहे.
