जनतेज न्युज

ठाणे महानगरपालिकेच्या स्थापनेला ४० वर्ष पुर्ण

प्रतिनिधी , ठाणे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे वर्धापनदिनी कर्मचाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होऊ शकला नाही. यंदा मात्र वर्धापनदिनाचे औचित्य साधत शुक्रवार दिनांक ०७ ऑक्टोबर रोजी ठाणे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम व गणेश आरास स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा सकाळी ११ वा. राम गणेश गडकरी रंगायतन येथे आयोजित केला असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली. ठाणे महानगरपालिकेच्या स्थापनेला ४० वर्षे पूर्ण झाली आहेत. नगरपालिका ते महानगरपालिका असा विकासाचा आलेख उंचावणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या विकासाच्या यशात लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, ठाणे महानगरपालिका कर्मचारी यांचा निश्चितच मोलाचा सहभाग आहे. त्यामुळेच दरवर्षी ठाणे महापालिकेचा वर्धापनदिन हा कर्मचारी कर्मचाऱ्यांसाठीच जल्लोषात साजरा करीत असतात. गेली दोन वर्षे ठाणे महापालिकेचा वर्धापन दिन कोरोना महामारीमुळे होवू शकला नव्हता. कोरोना काळातही लोकप्रतिनिधींबरोबर प्रशासनानेही नागरिकांना उपलब्ध केलेल्या वैदयकीय सेवासुविधांमुळे ठाण्यातील कोरोना आटोक्यात आला. त्यामुळे यंदा महापालिकेचा वर्धापनदिन हा जल्लोषात साजरा होत आहे. या निमित्ताने सार्वजनिक गणेशोत्सव आरास स्पर्धा २०२२मधील विजेत्या गणेशमंडळांचा पारितोषिक देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.