जनतेज न्युज

50 व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात नंदुरबार जिल्ह्याचे मोठे यश

प्रतिनिधी, नंदुरबार : नागपूर येथे नुकतेच 2022/ 23 या शैक्षणिक क्षेत्रातील 50 सा वे  राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले 4 मे ते 8 मे दरम्यान ऑनलाईन स्वरूपात हे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.  राज्यस्तरावरून या विज्ञान प्रदर्शनासाठी 396 उपकरणांच्या सहभाग नोंदवण्यात आला होता. यात  जिल्ह्यातून 11 उपकरणांची निवड करण्यात आली.       या विज्ञान प्रदर्शनात पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळ संचलित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा  सोनखांब येथील जोसेफ नाईक या विद्यार्थ्यांने प्रथम क्रमांक तर शंकर शिंदे व जगन ठाकरे या विद्यार्थ्यांनी पाचवा क्रमांक मिळवत यश संपादन केले.  प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक मिळवलेल्या जोसेफ नाईक यांनी  सीमा सुरक्षा बळकट करण्यासाठी बी.ए सॅटॅलाइट या उपकरणाची निर्मिती केली होती. प्रकाश लहरीच्या माध्यमातून सीमा क्षेत्रावर पाहिजे त्या स्थळी अचूक कोड प्रोग्रॅम सांख्यिकी मजकूर ऑडिओ, व्हिडिओ इमेजेस फाईल अशी माहिती पुरवणे व स्वयंचलित आधुनिक युद्ध शस्त्र  रायफल रणगाडे विमान यांचा संदेश देऊन नियंत्रण करणे व शत्रूच्या शस्त्रांवर हल्ला करणे व डाटा हँकिंग पासून वाचवणे अशा स्वरूपाची माहिती या उपकरणाद्वारे  मांडण्यात आली आहे.       माध्यमिक गटातून शंकर शिंदे व जगन ठाकरे यांनी पाचवा क्रमांक मिळवत रेल्वे स्थानकावरील जीवन संरक्षक बॅरिकेट या उपकरणाची निर्मिती केली आहे. ह्या उपकरणाचा उद्देश रेल्वे स्थानकावर होणाऱ्या अपघातांना टाळणे व लोकांचे जीव वाचवणे आहे. जेव्हा रेल्वे प्लेटफॉर्मवर येत असते तेव्हा बरेच लोक चालत्या रेल्वेतून उतरण्याच्या किंवा चढण्याच्या प्रयत्न करतात. त्यापासून होणारे अपघात टाळण्यासाठीच तसेच पलीकडच्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी लोक जिन्याचा उपयोग न करता रेल्वे रुळावरून जातात. अशा वेळी होणारे अपघात टाळण्यासाठी या उपकरणाची निर्मिती करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना योगेश खर्डे व मनोहर वाले या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले जोसेफ नाईक शंकर शिंदे व जगन ठाकरे यांनी मिळवलेल्या यशा बद्दल संस्थेचे अध्यक्ष सुहास नटावदकर व मुख्याध्यापिका सुवासिनी नटावदकर व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.