प्रतिनिधी , अमरावती : शतकोत्तर परंपरा लाभलेल्या अमरावतीच्या तळेगाव दशासर येथील शंकर पटाला नवी संजीवनी मिळाली आहे. नऊ वर्षानंतर पहिल्यांदा राजा सर्जा यंदा धावणार आहेत. तळेगाव दशासर येथील शंकर पट विदर्भात प्रसिद्ध आहे. न्यायालयाने बंदी घातल्यामुळे, हा शंकर पट बंद करण्यात आला होता. त्यानंतर कोरोनामुळे दोन वर्ष हा शंकरपट भरला नाही. तब्बल नऊ वर्षापर्यंत पटातील धावणाऱ्या बैल जोड्या शेतकऱ्यांना घरीच होत्या. यंदा शंकरपट सुरू व्हावा, यासाठी आमदार प्रताप अडसड यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन मागणी मांडली होती. जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना हा पट सुरू करण्याचे पत्र मंत्री विखे पाटील यांनी दिले. त्यामुळे शंकर पटावरील बंदी हटवल्याने कृषक सुधार मंडळाच्या वतीने हा शंकर पट भरविण्यात येणार आहे.१५ ते २० जानेवारी असा ५ दिवस शंकर पट चालणार आहे.
