जनतेज न्युज

विश्रामबाग चौकात पशुखाद्य घेऊन चाललेला ट्रक पलटी ; अपघातात कोणतीही जीवितहानी नाही

प्रतिनिधी , सांगली : सांगलीतील विश्रामबाग चौकात पशुखाद्य घेऊन चाललेला ट्रक पलटी होऊन अपघात झाला आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली , तरी एक व्यक्ती किरकोळ जखमी झाला आहे. घटनेनंतर विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कलाप्पा पुजारी आपल्या टीम सहित घटनास्थळी दाखल झाले. विश्रामबाग चौकातून मिरजेकडे जात असताना ट्रक चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटले आणि बाजूच्या कट्ट्याला धडक बसल्याने ट्रक पलटी झाला. ट्रक पलटी होत असताना विजेच्या खांबाला जाऊन धडकला. या ठिकाणी विजेचा खांब नसता तर रस्त्याच्या खालच्या बाजूला मिरजेकडून येणाऱ्या रस्त्यावर हा ट्रक पलटी झाला असता आणि यामुळे मोठा अपघाती होऊ शकला असता. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ट्रक मधील एक व्यक्ती किरकोळ स्वरूपात जखमी झाला आहे. विश्रामबाग पोलीस आणि वाहतूक पोलीस यांच्या मदतीने पलटी झालेला ट्रक बाजूला काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तर ट्रक पलटी होत असताना वीज मंडळाच्या उच्च दाबाच्या वाहिन्या तुटल्या आणि यामुळे या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. घटनेनंतर वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा तातडीने धाव घेऊन परिसरातील वीज पुरवठा खंडित केला. या घटनेची विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.