प्रतिनिधी , औरंगाबाद : महापालिका मुख्यालयात शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास एका तरुणाने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या तरुणाने तेल अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांनी दोघांनाही अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले.
नरेश पाखरे, जयकिशन कांबळे अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. काल्डा कॉर्नर येथील सारा प्राईडजवळ बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर कारवाई करावी, अशी मागणी पँथर सेनेचे जिल्हाप्रमुख पाखरे आणि कांबळे यांनी महापालिकेकडे तीन वर्षापासून सुरू ठेवली आहे.२ मार्च रोजी त्यांनी महापालिका प्रशासनाला आत्मदहन करणार असल्याचे निवेदनही सादर केले होते. यासंदर्भात अतिक्रमण हटाव विभागाने आतापर्यंत इमारत बांधणाऱ्यांना दोन वेळेस नोटीस दिली आहे. त्यानंतर प्रकरण न्यायालयात गेले आहे. या आशयाचे पत्र काढले. हे पत्र देण्यासाठी गुरुवारी महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी पाखरे यांचा शोध घेत होते,पण ते सापडले नाहीत. दरम्यान, शुक्रवारी सकाळपासूनच जवाहरनगर आणि सिटी चौक पोलीस महापालिकेत येऊन थांबले होते. पोलिसांची नजर चुकवून पाखरे तिसऱ्या मजल्यावर गेले. तेथून त्यांनी उडी मारण्याचा प्रयत्न केला. साध्या वेषात असलेल्या पोलिसांनी आपली भूमिका बदलत पत्रकार असल्याचे सांगून गच्चीवर व्हिडिओ बनवण्याच्या नादात त्यांना अडकवून ठेवले. दुसऱ्या एका पोलिसाने पाठीमागून त्यांची कंबर पकडून खाली गच्चीवर लोटले. पाखरे यांना ताब्यात घेऊन खाली येईपर्यंत त्यांचा दुसरा साथीदार जयकिशन कांबळे यांनी स्वतःच्या अंगावर तेल ओतून घेतले, पोलिसांनी लगेच त्यांच्या हातातील कॅन हिसकावून घेतली. या कॅनमध्ये ८० टक्के पाणी २० टक्के डिझेल होते. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन सिटी चौक पोलीस ठाण्यात नेले.
