प्रतिनिधी , कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक जवळ येताच पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी खासदार धनंजय महाडिक गटामधील राजकारण तापू लागलं आहे. पालकमंत्री सतेज पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावे असलेल्या डीवायपी मॉलचा १५ ते १६ कोटी रुपयांचा घरफाळा थकीत असून या गाळ्या संदर्भातील माहिती लपवून पाटील यांनी महापालिकेची कोट्यावधी रुपयांची लूट केल्याचा गंभीर आरोप माजी खासदार धनंजय महाडिक यांनी केला आहे. यासंदर्भातील कागदपत्रे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली आहेत. येत्या दहा दिवसात ही थकबाकी दंडासह वसूल करावी, अन्यथा महानगरपालिकेसमोर आंदोलनाचा इशारा महाडिक यांनी दिला आहे. तसेच जोपर्यंत सतेज पाटील घरफळा भरत नाहीत तोपर्यंत नागरिकांनीही घरफाळा भरून नये, असं आवाहन देखील महाडिक यांनी केलं आहे. पालकमंत्री सतेज पाटील सत्तेचा आणि पदाचा वापर करून गैरकारभार करत असल्याचे देखील महाडिक म्हणाले आहेत. मुलाच्या लग्नावेळी माझ्यावर दाखल झालेला गुन्हा राजकीय द्वेषातला असून यामागेही पालकमंत्री सतेज पाटील यांचा हात असल्याचा गंभीर आरोप महाडिक यांनी सतेज पाटलांवर केला आहे.
महाडिक यांच्या या आरोपाला महानगरपालिकेतील काँग्रेसच्या सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पालकमंत्री पाटील यांनी घरफाळा महानगरपालिकेची कसलीही फसवणूक केली नसुन त्यांची कोणत्याही प्रकारची देणी महानगरपालिकेकडे नसल्याचा दावा या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. माजी खासदार महाडिक यांच्याकडे विकासाचा कोणताही मुद्दा नसल्याने प्रत्येक निवडणुकीत हाच मुद्दा घेऊन ते समोर येतात अस सांगत महाडिक यांच्या आदर्श भिमा वस्त्रम या इमारतीमध्ये अनेक त्रुटी असल्याचा आरोप गटनेते शारंगधर देशमुख यांनी केला आहे. महाडिक यांनी महानगरपालिकेच्या दारात आंदोलन करावं या निमित्ताने महानगरपालिकेची इमारत ते पाहतील अस म्हणत काँग्रेस नेत्यांनी महाडिक यांची खिल्ली उडवली आहे.
