जनतेज न्युज

अकोलेच्या शेतकऱ्याची किमया; चार एकर जमिनीवर अंजिराची लागवड

प्रतिनिधी , अकोले तालुक्यातील जाचकवाडी हे जवळपास दीड हजार लोकसंख्येचे गाव. या भागातील बहुतांश जमीन ही बागायती आहे. परंतु संगमनेर – अकोले तालुक्याच्या सीमेवर शेतकरी कारभारी कमळू महाले यांनी त्यांच्या अथक परिश्रमाने चार एकर क्षेत्रांत अंजिराची बाग फुलविली आहे. त्यातून भरघोस उत्पन्नही मिळविले आहे.

प्रथम त्यांनी १९९० साली डाळिंब , द्राक्षे या फळपिकांची लागवड केली.
डांळिबाचे उत्पन्न चांगले आले, मात्र तेलकट डाग व मर रोग यामुळे डाळींब पिकासही म्हणावे असे यश आले नाही. त्या पीकामध्ये बाजारभावाची उणीव, चढउतार असल्याने त्यांना इतर पीकात उतरावे असे वाटले.२००० साली महाले मित्राच्या दुचाकीवरून बारामती येथे रोपवाटिकेत गेले असता अंजिर मात्र किफायतशीर ठरले. मग मात्र त्यांनी अंजिर हेच पीक घेण्याचा मनापासून निर्धार केला.सुरवातीला त्यांनी 30 गुंठ्यामध्ये अंजिराची लागवड केली. टप्प्याटप्याने तीनशे, चारशे आणि 2020 साली अखेर चार एकरामध्ये एकुण दोन हजार अंजीर झाडाची लागवड झाली आहे. अंजिर पीकाचे ऑगस्ट मध्ये छाटणी करुन साधारण साडेचार महिन्यानंतर फळ तोडणीस सुरुवात होते.जुनी व नवीन मिळून प्रती झाडापासून सरासरी पंचवीस ते तीस किलो उत्पन्न मिळते. या फळांस प्रती किलो 90 ते 100 रुपयांपर्यंत दर मिळतो आहे.कारभारी महाले व त्यांचा मुलगा योगेश यांनी अंजिर बागेस रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रीय खतांचा जास्तीस जास्त वापर केला. त्यामुळे त्यांच्या मालाला चमक, गोडवा व टिकाऊपणा चांगल्या प्रकारे मिळाला.शेण,गोमूत्र,चणाडाळ,गुळ अशा प्रकारचे जिवामृत त्यांनी अंजिर झाडास वापरले. महाले कुटुंब जिवामृत हे स्वत: शेतातच बनवतात. बागेचे योग्य व्यवस्थापन असल्याने करपा आणि तांबेरा रोग त्यांच्या बागेकडे फिरकलाच नाही. तसेच पाण्याचा निचरा योग्य केल्यामुळे अतिवृष्टिमुळेही काही नुकसान झाले नाही.

महाले यांच्या स्वभावातच शेतकरी संशोधकाची वृत्ती दिसून येते. स्वावलंबनातून स्थैर्याकडे, श्रमातून समृध्दीकडे, ज्ञानातून अनुभवातून प्रगतीकडे आणि शेतीतून समग्र परीवर्तन घडवणे हा त्यांचा दृष्टिकोन दिसून येतो. अंजिराच्या उत्पादनापासून त्यांना यंदा खर्च वजा करुन निव्वळ नफा दहा ते बारा लाखापर्यंत मिळणार असल्याचे ते सांगतात. पुणे जिल्ह्यातील आळेफाटा,बेल्हा, ओतूर या ठिकाणी स्थानिक बाजारात ते स्वतः फळाची विक्री करतात. कोरोना विषाणूच्या संसर्गामधील लॉकडाऊनच्या काळात बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या, बरेच जण बेरोजगार झाले. मात्र, त्यावेळी महाले यांनी मार्च ते मे या तीन महिन्यात चार ते पाच लाखांचे उत्पन्न मिळविले.