जनतेज न्युज

सावळजच्या बाळू लोखंडेंच्या खुर्चीचा सातासमुद्रापार प्रवास

प्रतिनिधी , ज्येष्ठ क्रिडा पत्रकार सुनंदन लेले यांनी ट्विटर वर पोस्ट केलेला मँचेस्टर येथील रेस्टॉरंट मधील एका खुर्चीचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. आणि त्या खुर्चीच्या पाठीमागे लिहिलेले बाळू लोखंडे, सावळज असे नाव आज सर्वांच्या तोंडी गाजत आहे. मराठी माणसाचा व्यवसाय साता समुद्रापार गेल्याची निशाणीच जणू या व्हीडिओ तुन समोर येताना दिसत आहे.
सावळज हे सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील एक प्रमुख बाजारपेठेचे गाव आहे. आज सोशल मीडियावर हे गाव आणि बाळू लोखंडे यांचे नाव सध्या अत्यंत चर्चेत आले आहे. सुनंदन लेले यांना मँचेस्टर येथील एका रेस्टॉरंट बाहेर एका खुर्चीवर हे नाव दिसले आणि त्यांनी त्या खुर्ची चा व्हीडिओ बनवून तो ट्विटर वर टाकून मँचेस्टर मध्यें मराठी नाव पाहून आश्चर्य वाटल्याचे कॅप्शन टाकले ,आणि बघता बघता हा व्हीडिओ प्रचंड व्हायरल झाला. बाळू लोखंडे यांना असंख्य फोन येऊ लागले. आणि त्यांनाही आपली खुर्ची सातासमुद्रापार पोहोचल्याचा सार्थ अभिमान वाटला.
बाळू लोखंडे हे सावळज येथील एक प्रसिद्ध मंडप आणि केटरिंग व्यावसायिक आहेत. गेल्या वीसेक वर्षांपासून ते हा व्यवसाय करीत आहेत. व्यवसायाची गरज म्हणून 15 वर्षांपूर्वी त्यांनी वजनाने जड असल्याने तसेच वाहतुकीला अडचणीच्या वाटणाऱ्या या लोखंडी खुर्च्या भंगारात विकून टाकल्या. आणि नवीन आकर्षक प्लॅस्टिकच्या खुर्च्या घेतल्या. त्या जुन्या लोखंडी खुर्च्यापैकी कोणीतरी या खुर्च्या मँचेस्टरला पाठवल्या आणि त्यातीलच ही एक खुर्ची असावी , असा या खुर्चीचा प्रवास बाळू लोखंडे यांनी सांगितला आहे. पण हे काहीही असले तरी सावळज सारख्या छोट्याशा गावातील मंडप व्यावसायिक आणि त्यांच्या या खुर्चीचा प्रवास नक्कीच अभिमानास्पद आहे.