प्रतिनिधी, यवतमाळ : सरकारी काम, अन् चार महिने थांब, हे अंगवळणी पडलेल्या जनतेला त्यांनी केलेली मागणी वेळेपूर्वी पूर्ण झाली की अत्यानंद होतो, याची प्रचिती नुकतीच पुसद शहरा नजीकच्या श्रीरामपूर येथे आली. कचरा वाहून नेण्यास त्रास होत असल्याने कचरा गाड़ीची मागणी महिलांनी केली होती. ती लगेच पूर्ण झाली. अन् महिलांनी ‘गाडीवाला आया है, तू कचरा निकाल’, या गाण्यावर चक्क कचरा गाडीसमोरच ठेका धरला. यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद तालुक्यातील शहराला लागून असलेली श्रीरामपूर ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. यात नोकरदार वर्गाचा मोठा भरणा आहे. या ग्रामपंचायतीमध्ये महिलांना घरातील कचरा सार्वजनिक ठिकाणी ठेवलेल्या कचराकुंडीत नेऊन टाकायला फार त्रास सहन करावा लागत होता. कचरा वाहून नेण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा, यासाठी दीड महिन्यापूर्वी बावणे लेआऊटमधील महिलांनी ग्रामपंचायतमध्ये जाऊन कचरा गाडीची मागणी केली. या मागण्यांची त्वरित दखल सरपंच आशिष काळबांडे आणि सदस्य विजय राठोड, मधुकर कलींदर यांनी घेतली.
