प्रतिनिधी, जळगाव : सातपुडा पर्वतरांगांमध्ये राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या होळी सणाच्या आधी आदिवासी भागांमध्ये भोंगऱ्या बाजाराला सुरुवात होते. वर्षभर आदिवासी बांधव काम धंदा निमित्त बाहेरगावी गेलेले असतात परंतु होळीच्या सणानिमित्त भोंगऱ्या उत्साहासाठी आपल्या गावी येत असतात. गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भोंगर्या बाजाराच्या उत्सव साजरा होत नव्हता. परंतु यावर्षी कोरोना चा प्रादुर्भाव कमी असल्या कारणाने आदिवासी बांधवांमध्ये भोंगऱ्या उत्सवा निमित्त त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. चोपडा तालुक्यात सर्वात मोठा भोंगर्या बाजार सातपुडा पर्वत रांगांमधील वैजापूर येथे होत असतो. या भोंगर्या बाजारात आदिवासी बांधव विविध वस्तू व साहित्यांच्या खरेदी करत असतात आणि पारंपारिक वेशभूषा परिधान करून आदिवासी बोलीभाषेच्या गीतावर व भल्यामोठ्या ढोलच्या तालावर नृत्य करीत असतात. भोंगर्या बाजार पाहण्यासाठी आजू बाजूच्या परिसरासह लांबून नागरिक येत असतात या भोंगर्या बाजारात आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडते.
