प्रतिनिधी, नाशिक : भारतात खुरासणीची लागवड ओरिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आसाम, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात, झारखंड व पश्चिम बंगाल इत्यादी राज्यात के ली जाते. आजमितीस भारतात या पिकाचे लागवडीखालील क्षेत्र २३४.२ हजार हेक्टर इतके असुन उत्पादकता ३१० कि./हे. इतकी आहे. महाराष्ट्रात नाशिक पालघर, सातारा, नंदुरबार, उस्मानाबाद, लातूर, कोल्हापूर, औरंगाबाद, पुणे, अहमदनगर इत्यादी जिल्ह्यात याची लागवड होते. राज्यात या पिकाखाली २० हजार हेक्टर इतके असुन उत्पादकता १८५ कि./हे. इतकी आहे. भारत देशाची तुलना करता राज्यातील उत्पादकता ही खूप कमी आहे. राज्यातील उत्पादकता कमी असण्याची कारणामध्ये हलक्या, पडीक, नापीक जमीनीत या पिकाची लागवड हे प्रमुख कारण होय. तद्नंतर पिकाची स्वविसंगतता स्वरूप, आदिवासी क्षेत्रात सुधारीत तंत्रज्ञानाचा कमी अवलंब, त्यात सुधारीत जाती, पेरणी पध्दत, सेंद्रिय व रासायनिक खतांचा शिफारशीपेक्षा कमी आणि असंतुलित वापर इत्यादी होय. शेतकऱ्यांनी या कारणावर मात करून अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी इगतपुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी येथे खुरासानी या पिकाचे संशोधन चालू असून बदलत्या हवामान, पर्यावरणामुळे खुरासनी हे पीक बदलत्या वातावरणात कसे तग धरेल व त्याचे उत्पन्न कसे वाढेल याचे संशोधन चालू असून इगतपुरी तालुका हा मुख्यतः भात पिकाचा तालुका असून जर खुरासनी या पिकाचे संशोधन होऊन इगतपुरी तालुक्यात या पिकाच्या लागवडीतून शेतकऱ्यांना हे पीक घेऊन भरघोस उत्पन्न देण्याचे साधन होऊ शकते व बळीराजाची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. इतर तालुक्यांनाही त्याच लाभ होऊ शकतो. केंद्र शासनाने 6695 प्रती क्विंटल इतका हमीभाव दिला आहे. शेतकऱ्यांनी या पिकाची लागवड कशी करावी व त्याचा लाभ कसा घ्यावा यासाठी शेतकरी बांधवांनी इगतपुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ विभागीय कृषी संशोधन केंद्रास भेट द्यावी असे आवाहन सहाय्यक प्राध्यापक डॉ कैलास भोईटे यांनी केले आहे.
