प्रथिनिधी, ठाणे : शिवसेनेने लोकांच्या वरातीत फुकटचे नाचू नये – आनंद परांजपे
ठाण्यातील पाचपाखाडी, सावरकर नगर येथील म्हाडाच्या सोसायट्यांच्या लीज रेंट आणि एन ए कराचा प्रश्न मार्गी लावत या करांवरील व्याज आणि दंड माफ करुन या सोसायट्यांमध्ये राहणार्या नागरिकांना दिलासा मिळवून देण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आपण संघर्ष केला आहे. मात्र, येथील नागरिकांचे लीज रेंट आणि अकृषीकर कराचा (एनए) प्रश्न आपण मार्गी लावल्यानंतर आता शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप बारटक्के हे फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत. नागरिकांना दिलासा देण्यासाठी अमीत सरैय्या आणि मयूर शिंदे यांनी प्रचंड पाठपुरावा केला होता. मात्र, दुर्देवाने ‘नाच ना जाने अंगण तेढा’ या प्रमाणे राष्ट्रवादीचे काम, श्रेय राष्ट्रवादीचे मात्र लोकांच्या वरातीत फुकटचे नाचायचे असे उद्योग दिलीप बारटक्के यांच्याकडून केले जात आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली.
पाचपाखाडी, सावरकर नगर भागामध्ये म्हाडाच्या 110 सोसायट्या आहेत. या सोसायट्यांच्या जमिनीची मालकी अद्यापही म्हाडाकडे आहे. तसेच, स्थानिक नागरिक एनए कर भरण्यास तयार आहेत. मात्र, त्यावर तसेच लीज रेंटवर व्याज आकारण्यात येत असल्याने नागरिकांना ही रक्कम भरणे त्रासदायक ठरत होते. ही बाब स्थानिक नागरिकांनी अमीत सरैय्या यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सरैय्या यांनी गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याकडे पाठपुरावा करुन हा प्रश्न निकाली लावला आहे. मात्र, याचे श्रेय सेनेचे माजी नगरसेवक दिलीप बारटक्के हे घेत असल्याने स्थानिक नागरिकांसोबत परांजपे यांनी पत्रकार परिषद घेऊन या मागील वस्तूस्थिती उघडकीस आणली. यावेळी मयूर शिंदेही उपस्थित होते.
