जनतेज न्युज

खाण्याचे पार्सल आले आहे अशी बतावणी करत तब्बल दहा लाखांची लूट

प्रथिनिधी, ठाणे : तुमचे खाण्याचे पार्सल आले आहे अशी बतावणी करत तब्बल दहा लाखांची लूट केल्याची घटना ठाण्यात घडल्याने खळबळ उडाली आहे. ठाण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी दिवसा उजेडी अशी घटना घडल्यामुळे घरी येणाऱ्या डिलिव्हरी बॉईज बद्दल नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.

हल्ली सर्वांच्याच हातात स्मार्टफोन्स आल्याने त्यावरून शॉपिंग करण्याकडे सर्वांचाच कल असतो त्यातून स्वीगी आणि झोमॅटो सारख्या फूड डिलिव्हरी ऍप्स मुळे आपल्या आवडीचे खाद्यपदार्थ मागविणे सोप्पे झाले आहे. परंतु डिलिव्हरी बॉय च्या रूपात आपल्या दारात साक्षात दरोडेखोर येतील याची मात्र कोणीच कल्पना केली नव्हती. घटना ९ मार्च २०२२ ची आहे ज्यात पाचपाखाडी भागातील जय वसंत इमारतीत राहणाऱ्या महिलेच्या घरी दुपारी साडे बाराच्या सुमारास दोन स्वीगी चे डिलिव्हरी बॉईज आले. परंतु आपण कोणतेच पार्सल ऑर्डर केले नसल्याचे स्पष्ट करताच त्यांनी दिलगिरी व्यक्त करून प्यायचे पाणी मागितले. फिर्यादी महिलेने पाणी देण्यासाठी दार उघडताच आरोपी जय भगत आणि सत्यवान देढे यांनी घरात घुसून तेथील मुलाला ठार मारण्याची धमकी देत पाच लाख रुपये रोख आणि पाच लाखांचे दागिने घेऊन पोबारा केला. नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत cctv फुटेज आणि तांत्रिक पद्धतीने तपास करत सदर आरोपीसह त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला अटक केली. आरोपी जय भगत यांच्याकडून काही मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. झटपट पैसा मिळावा यासाठीच त्यांनी हे कृत्य केल्याची माहिती नौपाडा विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त सोनाली ढोले यांनी दिली. असे प्रकार भविष्यात पुन्हा होऊ नयेत म्हणून सर्वच इमारतीतील रहिवाशांनी खबरदारीचे उपाय योजावेत असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त सोनाली ढोले यांनी केले.