प्रथिनिधी, धुळे : धुळे केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात महागाईचा भडका उडाला असून सर्वसामान्य जनतेचे जगणे असह्य झाले आहे, येणाऱ्या काळात त्याचे परिणाम भारतीय जनत पक्षाला भोगावे लागतील. त्यामुळे देशातील जनता केंद्रातील भाजपा सरकारला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महागाई वाढवणाऱ्या केंद्रातील भाजपा सरकार आणि महागाईच्या विरोधात जनतेने आता रस्त्यावर उतरावे असे आवाहन महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा धुळे ग्रामीणचे आ कुणाल पाटील यांनी केले आहे.
केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस यांची प्रचंड प्रमाणात दरवाढ करुन देशात महागाई वाढविली आहे. अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रीय नेते राहूल गांधी यांनी महागाईमुक्त भारत आंदोलनाची हाक दिली आहे. त्याअनुषंगाने आज धुळ्यात महाराष्ट्राचे माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील, जिल्हा प्रभारी माजी मंत्री डॉ. शोभाताई बच्छाव, सह प्रभारी प्रदिप राव यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा काँग्रेस पक्षाच्यावतीने भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील हे धरणे आंदोलन धुळ्यातील क्यूमाईन क्लब येथे करण्यात आले.
