प्रतिनिधी , सिंधुदुर्गा : आज दि 18 जून 2022 रोजी सकाळी 6.00 वाजता च्या सुमारास वेंगुर्ले तालुक्यातील मौजे दाभोली-बागायतवाडी येथील सीताराम आरोलकर यांना त्यांच्या विहीरी मध्ये वन्यप्राणी बिबट पडला असलेचे दिसले. त्यांनी तात्काळ त्याबाबत स्थानिक वनकर्मचा-यांना माहिती दिली असता वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने तत्परतेने घटनास्थळी दाखल होत 20 ते 25 फूट खोल विहिरीतून वन्यप्राणी बिबट यास सुखरूप बाहेर काढले. तत्पूर्वी कठडा नसलेल्या या विहिरीत ग्रामस्थांनी विहिरीमध्ये दोरखंडाच्या साहाय्याने पाण्यात फळी सोडल्याने त्या फळीचा आधार घेत बिबट्या त्यावर बसून राहिला.
नर जातीचा हा 2.5 ते 3 वर्षे वयाचा हा बिबट भक्ष्याच्या मागे धावताना अंदाज न आलेने कठडा नसलेल्या या विहिरी मध्ये पडला असावा, असे वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ श्री . अमृत शिंदे यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले, स्थानिक ग्रामस्थांनी वेळीच माहिती वनविभागाला देऊन बचाव कार्यास देखील मदत केल्याने वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या अनुसूची 1 मध्ये समाविष्ट अन्नसाखळीतील सर्वोच्च स्थानी असलेल्या वन् प्राणी बिबट चा जीव वाचवता आला त्यासाठी ग्रामस्थांचे वनविभागाकडून आभार व्यक्त करण्यात आले.
पशु वैद्यकीय अधिकारी कुडाळ श्री ठाकूर यांचे कडून रेस्क्यू करण्यात आलेल्या वन्यप्राणी बिबट ची वैद्यकीय तपासणी करून त्यास नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
सदर वन्यप्राणी बिबट चे रेस्क्यु प्रभारी उपवनसंरक्षक श्सावंतवाडी श्री. दीपक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी कडावल अमित कटके, वनपाल मठ हरी लाड, वनपाल नेरूर धुळु कोळेकर, वनरक्षक मठ सूर्यकांत सावंत, वनरक्षक तुळस विष्णू नरळे, वनरक्षक नेरूर सावळा कांबळे यांनी पोलिस पाटील जनार्धन पेडणेकर व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने यशस्वी केले.
