जनतेज न्युज

नामांकित कंपन्यांचे ४ लाख ७ हजार रुपये किमतीचे मोबाईल चोरी करणारे तीन आरोपी अटकेत

प्रतिनिधी, ठाणे : ठाण्यातील घोडबंदर रोड येथे विनायक सावंत नामक एक व्यक्ती हायपरसिटी मॉल जवळून पायी चालत जात असताना तीन इसम त्यांच्या समोरून चालत आले. त्यांनी मुद्दाम जाणूनबुजून विनायक यांची कळ कडून त्यांच्यासोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. या दरम्यान आरोपींनी विनायक यांच्या खिशातील ४५ हजार रुपये किमतीचा आयफोन कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पोबारा केला. हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर विनायक यांनी ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्यात धाव घेत आपल्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी विनायक सावंत यांची बाजू ऐकून घेत अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करून घेतला. हि बाब कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश बाबशेट्टी यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागरिकांमध्ये अशा प्रकारच्या घटनेची जनजागृती केली. या दरम्यान कासारवडवली पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक भूपेश साळुंखे यांना गुप्तबातमीदाराच्या मदतीने तीन जन संशयास्पद हालचाल करत असल्याची बातमी मिळाली. हि बातमी मिळताच कासारवडवली पोलिसांनी सापळा रचून महम्मद रफिक अस्लम शेख, करण तेलकर, मुशरफ खुरेशी या तीन जणांना ताब्यात घेतले आणि त्यांची कसून चौकशी केली असता या तिघांकडून पोलिसांनी विविध नामांकित कंपन्यांचे ४ लाख ७ हजार रुपये किमतीचे मोबाईल हस्तगत केले. गुन्ह्याची उकल झाल्यानंतर पोलिसांनी या तीनही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांच्याकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल पोलिसांना झाली या तीनही आरोपींनी चैन स्नेचींग सारखे गुन्हे केलेले देखील उघडकीस आले. या आरोपींकडून पोलिसांनी १ लाख १४ हजार ६०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने देखील हस्तगत केले. तसेच चारचाकी गाडी मारुती इको या गाडीचे सायलेंसर देखील पोलिसांनी हस्तगत केले. या सायलेंसरमधील किंमती धातू काढून त्यातून पैसे कमावण्यासाठी त्यांनी हा सायलेंसर चोरी केला होता. पोलीस तपासादरम्यान पोलिसांनी या आरोपींकडून एकूण ३ गुन्ह्यांची उकल केली असून पुढील तपास सुरु आहे. या अटक केलेल्या आरोपींकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तसेच हे एक मोठे रॅकेट असून आणखी मुद्देमाल हस्तगत होण्याची शक्यता देखील पोलिसांनी वर्तवली आहे. त्यासाठी पोलिसांनी या तीनही आरोपींची पोलीस कस्टडी घेऊन पुढील तपास सुरु असल्याचे वर्तकनगर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे यांनी सांगितले.