प्रतिनिधी, बुलडाणा : संपूर्ण राज्यभरातील निराधार, दिव्यांग, श्रावण बाळ, घटस्फोटीत असलेल्या ज्येष्ठ नागरिक, महिला व पुरुषांना मानधन स्वरूपात आर्थिक मदत दिली जाते, मात्र बुलडाणा जिल्ह्यातील प्रामुख्याने मेहकर तालुक्यामधील या लाभार्थ्यांना गेल्या चार महिन्यापासून आपले मानधन मिळाले नसून, अभावी सर्व लाभार्थी आता आर्थिक अडचणीत आले आहेत. तर उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयामार्फत या लाभार्थ्यांची नाहक अडवणूक केली जात असल्याचा आरोप या सर्व लाभार्थ्यांनी केलाय.प्रशासनाकडून कुठलीच सहानुभूती या जेष्ठ लाभार्थ्याप्रति दाखवण्यात येत नाही. अनेक नवीन लाभार्थ्यांचे प्रस्ताव देखील स्वीकारण्यास शासनाची उदासीनता दिसत असल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे संतप्त झालेल्या मेहकर तालुक्यातील शेकडो महिला पुरुषांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आहे. त्यांनी कारंजा चौकापासून रॅली काढत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. आणि चार महिन्यापासून प्रलंबित असलेले मानधन तात्काळ अदा करण्यात यावे, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय.
