जनतेज न्युज

आषाढी वारीकरिता वर्धा विभागातुन ६० विशेष बसगाडया

प्रतिनिधी, वर्धा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून आषाढीवारीच्या निमित्ताने पंढरपुरकरिता दरवर्षी विशेष बसफे-या सोडण्यात येतात. यावर्षी वर्धा विभागाने ६० बसगाड्यांचे नियोजन केले आहे. त्यामध्ये वर्धा आगारातुन सर्वाधिक बसेस उपलब्ध झाल्या आहेत.आषाढी एकादशी निमित्ताने मोठया संख्येने भाविक पंढरपुरला जातात. दोन वर्षाच्या कालावधीत भाविकांना पंढरपुरला जाता आले नाही. यंदा मात्र भाविकांना पंढरपुरला जाता येणार आहे. त्या अनुषंगाने अनेक भाविक पंढरपुरला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर भाविकांच्या सेवेकरिता एसटी महामंडळानेही पुढाकार घेतला आहे. वर्धा विभागातुन ६० विशेष बसगाडया पंढरपुरला जाणा-या भाविकांकरिता उपलब्ध करुण्यात आल्या आहेत. भाविकांनी नोंदणी केल्यानंतर बसगाडया उपलब्ध करण्यात येणार आहे. किमान ४४ प्रवासी आवश्यक असणार आहेत. ६ जुलै ते १४ जुलैपर्यतचे हे नियोजन आहे. भाविकांना ६ जुलैपुर्वी जायचे असल्यास त्यापुर्वी देखील त्यांच्या मागणीनुसार बस उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच बसच्या नियोजित प्रवासी क्षमतेइतके भाविक असल्यास गावातुनही बस उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले. भाविकांनी बसस्थानक, वाहतुक, नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.