प्रतिनिधी, पंढरपूर : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सावळ्या विठुरायाचे दर्शन हे भाविकांसाठी 24 तास आजपासून खुले करण्यात आले. परंपरेनुसार विठ्ठलाच्या शयनगृहातील पलंग काढून ठेवण्यात आला. तर विठ्ठलाच्या पाठी मऊमुलायम तक्या आजपासून ठेवण्यात आला आहे. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांना सहज सुलभ दर्शन घेता यावे. यासाठी 24 तास विठ्ठलाचे दर्शन आता खुले असणार आहे. यासाठी आजपासून विठ्ठलाचे नित्य होणारे राजोपचार देखील बंद करण्यात आले. आषाढी एकादशीनंतर होणाऱ्या प्रक्षाळ पूजेपर्यंत विठ्ठलाचे आणि रुक्मिणी मातेचे दर्शन हे भाविकांसाठी 24 तास खुले असणार आहे. प्रक्षाळ पूजेनंतरच पुन्हा एकदा विठ्ठलाचे राजोपचार पूर्ववत होतील. या कालावधीत केवळ विठ्ठलाची नित्यपूजा व सायंकाळी विठ्ठलाला लिंबू पाण्याचा नैवेद्य दाखवण्यात येतो.
