प्रतिनिधी, यवतमाळ : आपसी वादात चाकूने हल्ला करून युवकाचा खून करण्यात आला. वाद सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेलाही मारहाण करण्यात आली. ही घटना पाटीपुरा परिसरात घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी चोविस तासाच्या आत चार मारेकर्यांच्या मुसक्या आवळल्या. एका मारेकर्याच्या मागावर अजूनही पोलिस आहेत. विशाल कृष्णा रामटेके (वय 22, रा. पाटीपुरा) असे मृत युवकाचे नाव आहे. घटनेनंतर मृताची आई सुनीता कृष्णा रामटेके (वय 39) यांनी यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी विनोद तामगाडगे (वय 40) प्रमोद तामगाडगे ( वय 35), भगवान तामगाडगे (वय 50), चिनी ऊर्फ अनिकेत बागडे (वय 20), प्रशिक भगत (वय 18) व अमित भगत (वय 20, सर्व रा. आंबेडकरनगर, पाटीपुरा) यांच्याविरुद्घ गुन्हा नोंदविला.
