प्रतिनिधी, बीड : बीडच्या क्षीरसागर काका-पुतण्याचे राजकीय वाद सर्वश्रुत आहे. दरम्यान आगामी येवू घातलेल्या निवडणुकी निमित्त आता काका-पुतण्याची लढाई भाऊ बंधकीवर येऊन ठेपलीय. राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर आणि शिवसेना नेते योगेश क्षीरसागर या सख्ख्या चुलत भावंडांची प्रतिष्ठा निवडणुकीसाठी पणाला लागलीय. बीड जिल्हा आणि राजकारण समीकरण आहे. विधानसभा निवडणुकीनंतर सर्वात महत्त्वाची निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांची. माञ त्याआधीच जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. एरवी काका जयदत्त क्षीरसागर आणि पुतणे संदीप क्षीरसागर यांच्यातील राजकीय वाद उभ्या महाराष्ट्राने पाहिला मात्र आता येऊ घातलेल्या निवडणुकीत पहिल्यांदाच सख्खे चुलत भावंड आमने-सामने पाहायला मिळणार आहेत. आमदार संदीप क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांची जुळवा जुळव करत पहिली बैठक राष्ट्रवादी भवन येथे घेतली. दरम्यान आमदार संदीप क्षीरसागर यांनी काकासह चुलत बंधू योगेश क्षीरसागर यांच्यावर तोफ डागली आहे.
तर दुसरीकडे शिवसेना नेते योगेश क्षीरसागर यांनी देखील बैठकीचा सपाटा सुरू केला. बीड शहराला बकाल करण्याचं काम आमदार संदीप क्षीरसागरांनी केलं. त्यांनी कुठल विकास काम कधी केले ते समोर येऊन सांगावं असं आव्हान योगेश क्षीरसागर यांनी चुलत बंधू आमदार संदीप क्षीरसागर यांना दिले आहे. एकदाच होऊनच जाऊ द्या.असं सुचक वक्तव्य शिवसेना नेते योगेश क्षीरसागर यांनी केले आहे.येऊ घातलेली नगरपरिषदेची निवडणूक स्थगित झाली असली तरी क्षीरसागर बंधू कामाला लागले आहेत. विकास कामाच्या श्रेयावरून दोन्हीही भावंडात आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. एरवी काका विरुद्ध पुतण्या झालेल्या राजकीय लढतीत यंदा पहिल्यांदाच दोन्ही सख्खी चुलत भावंड आमने-सामने आले आहेत. त्यामुळे बीडच्या राजकारणात एक नवीन पर्व पाहावयास मिळत आहे.
