प्रतिनिधी, बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यात यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी रुंद वरंबा सरी म्हणजेच बीबीएफ पद्धतीने पेरणी केलेली आहे..बीबीएफ पद्धतीच्या पिकांना अतिपावसातही फटका बसला नाही. मात्र, पारंपरिक पद्धतीने पेरणी केलेल्या पिकांवर संकट आले आहे. पावसाने अनेक शेतात पाणी साचल्याने आता पिकांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव निर्माण होत आहे. त्यात उच्च आर्द्रता किडींचा प्रादुर्भाव वाढण्यासाठी पोषक ठरत आहे. जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सर्वत्र समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यात सार्वत्रिक ठिकाणी पडलेला पाऊस हा मध्यम स्वरूपाचा आहे. व रिमझीम पडलेला आहे.. तरीही, तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. ज्यामध्ये बुलडाणा, चिखली, मेहकर, सिंदखेड राजा, लोणार तालुक्यातील काही मंडळांचा समावेश आहे. संततधार व मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी शेतात पावसाचे पाणी साचलेले आहे..ज्या शेतकऱ्यांनी रुंद वरंबा सरी पद्धतीने सोयाबीनची पेरणी केली आहे. त्या ठिकाणी मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता कमी आहे. कारण पावसाचे पाणी पिकाभोवताल न थांबता, सरींमध्ये साचते व सरीद्वारे पाणी वाहून जाते. परंतु पारंपरीक पद्धतीने पेरणी केलेल्या पिकांना या पावसाचा फटका बसत आहे. दीर्घकाळ साचलेल्या पाण्यामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. आद्रता वाढल्याने इतर किंडीचा प्रादुर्भावाचा धोका वाढला आहे. शेतकऱ्यांनी कुठली काळजी करायला हवी या संदर्भात उपविभागीय कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी मार्गदर्शन केले आहे.
