जनतेज न्युज

ठाण्यातील पडझडीवर सिनेकलाकारांनी व्यक्त केली खंत

प्रतिनिधी, ठाणे : दरवर्षीच्या तुलनेत ठाण्यात यंदाच्या वर्षी पडझडीचे प्रमाण वाढले आहे. ठाण्यातील विविध ठिकाणी यंदाच्यावर्षी वृक्ष पडझड आणि फांद्या तुटण्याचे प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. या वृक्ष पडझडीवर आता सिने कलाकारांनी देखील खंत व्यक्त केली आहे. ठाण्यातील सिने कलाकार यांच्या घराजवळ झाड पडले होते. हे झाड जिवंत होते त्यामुळे ते पुन्हा जीवनदान देऊ शकत होते. मात्र, काही वेळातच हे पडलेले झाड छाटण्यात आल्यामुळे कलाकारांनी खंत व्यक्त केली आहे.
दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीदेखील पावसाने दमदार हजेरी लावली. मात्र यंदाच्या वर्षी या मुसळधार पावसामुळे वृक्ष पडझडीचे प्रमाण आणि फांद्यांच्या तुटण्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. ठाणे महानगर पालिका क्षेत्रात वृक्ष प्राधिकरण आणि वृक्ष संवर्धन संकल्पनेतून ठीक ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात आली आहेत. मात्र या काँक्रीटच्या जंगलात लावण्यात आलेली झाडे हि नैसर्गिक आपत्तीसमोर टिकू शकली नाही. दरवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी मुसळधार पावसामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पडझड झालेली पाहायला मिळाली आहे. यंदाचा पडझडीचा दर प्रतिदिवस कमीतकमी 8 ते जास्तीत जास्त ३५ असा आहे. त्यामुळे ही होत असलेली पडझड चिंतेची बाब बनली आहे. ठाण्यात या पडझडीमुळे कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी झाड पडून अनेक ठिकाणी दुचाकी, चारचाकी, तीन चाकी गाड्यांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पडझडीमुळे घरांचे देखील नुकसान झाले आहे.ठाण्यात राहत असलेल्या मराठी चित्रपट श्रुष्टीतले सिने कलाकार संतोष जुवेकर यांच्या घराजवळ मुसळधार पावसामुळे सुंदर बहरलेले एक भले मोठे वृक्ष उन्मळून पडले. हे वृक्ष जरी उन्मळून पडले असले तरी त्या झाडाची मुळे हि जमिनीत होती. त्यामुळे त्या झाडाला जीवनदान देऊ शकतो असे मत संतोष जुवेकर यांनी व्यक्त केली होती. मात्र काही कामानिमित्त कलाकार संतोष जुवेकर हे घराबाहेर गेले असता तेवढ्या कालावधीत या झाडाची छाटणी करून या झाडाचे छोटे तुकाडके करून एका कोपऱ्यात टाकण्यात आले होते. हि बाब संतोष जुवेकर यांच्या लक्षात आली असता त्यांनी सोशल मिडीयाच्या मदतीने या संपूर्ण घटनेचा निषेध व्यक्त केला. तसेच या संपूर्ण घटनेत आपण या झाडाला वाचवू शकलो नसून खंत व्यक्त करत जुवेकर यांनी माफी देखील मागितली आहे. पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडतात मात्र हि बहरलेली झाडे परिपक्व झालेली असून त्यांना मोठे होण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागतो त्यामुळे जेवढी झाडे उन्मळून पडतात त्या झाडांची छाटणी न करता त्यांना पुनर्जीवन देऊ शकतो आणि त्यांना जीवनदान दिल पाहिजे असे मत सिने कलाकार संतोष जुवेकर यांनी व्यक्त केल आहे.ठाणे महानगर पालिका क्षेत्रात ६० ते ७० टक्के झाडे हि विदेशी आहेत. हि झाडे विदेशी असल्यामुळे त्यांचा पर्यावरणाला जास्त उपयोग होत नसला तरी प्राणी आणि पक्षांच्या संगोपनासाठी हि झाडे अति महत्वाची असल्याचे मत पर्यावरण प्रेमी आणि वृक्ष संवर्धक रोहित जोशी यांनी व्यक्त केल आहे. या विदेशी झाडांपैकी अनेक विदेशी झाडांमुळे पक्षांना नैसर्गिक खाद्य उपलब्ध होतो. आपल्याला या बाबतची माहिती मिळाल्यानंतर रोहित जोशी यांनी लगेच त्या स्थळी धाव घेत हे उन्मळून पडलेल्या झाडाला टेकू देऊन पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करणार होते. मात्र त्या आधी या झाडाची छाटणी करून कत्तल केल्यामुळे खंत व्यक्त करण्यात आली आहे. नवीन लावलेल्या झाडांना बहरण्यासाठी आणि वृक्षामध्ये रुपांतर होण्यासाठी खूप कालावधी लोटतो. त्यामुळे उन्मळून पडलेल्या झाडांना पुन्हा जीवनदान देता येऊ शकत असे मत देखील यावेळी जोशी यांनी व्यक्त केल आहे. ठाणे महानगर पालिका क्षेत्रात उन्मळून पडलेल्या झाडांपैकी ९० टक्के झाडे हि पुनर्जीवित करता येऊ शकतात मात्र त्यांची छाटणी केली जात असल्यामुळे पर्यावरण प्रेमी आणि वृक्ष संवर्धक रोहित जोशी यांनी खंत व्यक्त केली आहे. झाडे हि काळाची गरज आहे आणि ती झाडे टिकवून ठेवणे हे आपल्याला शिकलं पाहिजे असे मत देखील जोशी यांनी व्यक्त केले.