प्रतिनिधी , धुळे : धुळे शहराच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या पाणी प्रश्नाबाबत महानगरपालिका अजूनही उदासीन आहे. धुळे शहरासाठी पिण्याचे पाणी हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. गेल्या वर्षभरापासून धुळेकरांना पाणी मिळावे यासाठी अनेक संघटनांनी तसेच समाजाच्या पक्षाने अनेक आंदोलन करून देखील धुळे शहराचा पाणी प्रश्न अजून सुटला नाही, त्यामुळे आज चक्क समाजवादी पक्षाकडून आयुक्तांना चपलांचा हार घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी समाजवादी पक्षाचे नेते डॉ. सरफराज अन्सार यांनी सांगितले की, महापालिका प्रशासनाकडून धुळ्यात रोटेशन पद्धतीने पाणीपुरवठा केला जातो, मात्र या रोटेशन मध्ये खोडा घालण्याचे काम धुळे महानगरपालिका प्रशासनाकडूनच केले जात आहे. देवपूर भागाला अवघ्या तीन दिवसानंतर पाणीपुरवठा करण्यात येतो देवपूर परिसरातील पाणीपुरवठा बाबत इतकी तत्परता दाखवली म्हणून मनापासून गुलाब पुष्प देऊन सत्कार करतो, मात्र धुळे शहरातील अनेक भाग असे आहेत की त्या ठिकाणी पंधरा पंधरा दिवस उलटूनही पाणी देण्यात आले नाही. त्यामुळे धुळे मनपा प्रशासनाचा निषेध करीत आयुक्तांना आम्ही आज चपलांचा हार घालणार आहोत अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.चपलांचा हार आणि गुलाब पुष्प घेऊन समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते व नेते धुळे महानगरपालिकेत आयुक्तांच्या दालनात पोहोचले .या आंदोलनाची माहिती धुळे शहर पोलिसांना मिळतात पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्यासह पोलीस पथक महानगरपालिकेत दाखल झाले व त्यांनी वेळीच आंदोलन करताना समज देऊन सदर आंदोलन स्थगित केले.
