प्रतिनिधी , मुंबई : आयकॉनिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर रोषणाई करण्यात आली आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांदरम्यान स्वातंत्र्यसैनिकांनी ऐतिहासिक पंजाब मेलला झेंडा दाखवला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे “आझादी का अमृत महोत्सव” उत्सवाचा एक भाग म्हणून आयोजित विविध सांस्कृतिक उपक्रमांसह मध्य रेल्वेने “आझादी की रेल गाडी और स्टेशन्स” कार्यक्रमाच्या आयकॉनिक सप्ताहाची संस्मरणीय सुरुवात केली.श्री अनंत लक्ष्मण गुरव आणि श्री मोतीलाल शंकर घोंगडे, या दोन स्वातंत्र्यसैनिक आणि आणखी ७ स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री अनिल कुमार लाहोटी, श्री शलभ गोयल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई विभाग यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १८ येथून ऐतिहासिक पंजाब मेलला झेंडा दाखवला. या कार्यक्रमादरम्यान दोन्ही स्वातंत्र्यसैनिकांसह आणखी ७ स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांचाही सत्कार करण्यात आला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना महाव्यवस्थापक म्हणाले, “स्वातंत्र्य चळवळीत रेल्वेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मध्य रेल्वेचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, पुणे, सातारा आणि नाशिकरोड स्थानके आणि मध्य रेल्वेची पंजाब मेल आणि हुतात्मा एक्स्प्रेस यांची या “आझादी की रेल गाडी और स्टेशन्स” कार्यक्रमाचा भाग होण्यासाठी निवड करण्यात आली आहे, ही अभिमानाची बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई हा इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे कारण भारतीय उपखंडातील पहिली ट्रेन येथून धावली आणि मुंबई हे स्वातंत्र्य चळवळीचे एक केंद्र राहिले आहे. सर्वात प्रतिष्ठित आणि सर्वात जुन्या ट्रेनपैकी एक, पंजाब मेलला आज हिरवा झेंडा दाखवण्यात आला, हा मध्य रेल्वेसाठीही अभिमानाचा क्षण आहे. मध्य रेल्वेवरील सर्वात जुनी आणि सर्वात प्रतिष्ठित ट्रेनपैकी एक, पंजाब मेल ही उत्सवाचा भाग म्हणून सुशोभित करण्यासाठी आणि झेंडा दाखवण्यासाठी भारतीय रेल्वेवर निवडलेल्या २७ ट्रेनपैकी एक आहे. दि. १ जून १९१२ रोजी बॅलार्ड पिअर मोल स्टेशनवरून पहिल्यांदा चाललेल्या पंजाब मेलने नुकतीच आपल्या सेवेची ११० वर्षे पूर्ण केली.युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ व शहराचे आयकॉन असलेले आणि मध्य रेल्वेचे मुख्यालय असलेले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे निवडलेल्या ७५ रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. या ऐतिहासिक प्रसंगाच्या स्मरणार्थ भारतातील सर्वात अधिक छायाचित्रित या इमारतीला विशेष रोषणाई करण्यात आली होती.”आझादी की रेल गाडी और स्टेशन्स” कार्यक्रमात मध्य रेल्वेच्या कलाकारांचे पथनाट्य आणि मध्य रेल्वेच्या आरपीएफ बँडची देशभक्ती गाणी सादर करण्यात आली. यावेळी मुख्यालय आणि मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील विभाग प्रमुख, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
