जनतेज न्युज

विद्यार्थ्यांनी घेतला भात लागवडीचा अनुभव

प्रतिनिधी, औरंगाबाद : अकोले तालुक्यातील मवेशी येथील श्री स्वामी समर्थ सेवा संस्थेचे समर्थ माध्यमिक विद्यालयाने नुकताच अनोखा अभिनव उपक्रमराबवत भात लागवडीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना शेतात करून दाखविल्यावर विद्यार्थ्यांनी स्वतः हा अनुभव घेतला. शाळेपासून अवघ्या दोनशे मीटर अंतरावर शाळेच्या स्वयंपाकी अनिता कोंडार यांची शेती आहे. त्यामुळे कार्यानुभव विषयाअंतर्गत भातशेती कशी केली जाते याचे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी त्यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी नववीचे विद्यार्थी स्वाती कोंडार, तेजल भांगरे, कार्तिक लांघी, रोहिनी थिगळे, अविनाश देशमुख, माधुरी भांगरे, तन्मय लोहकरे, प्रशांत भांगरे, दिलीप बोटे यांची निवड केली. क्रीडा व उपक्रमशील शिक्षक मच्छिद्रं देशमुख यांनी स्वत: या उपक्रमात सहभागी होऊन एक तास भात लागवड केली. जपानी व साधी पध्दत असे अनेक प्रकारच्या भात लागवडीचे प्रात्यक्षिक करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याने भाताचे चूड (रोप) घेवून रांगेत जाऊन भाताची लागवड केली. या भात शेतीसाठी रोप खंदणी, गाळ करणे, पाणी उपलब्ध करणे, चूड तयार करणे आदी कामे विद्यार्थ्यांनी अनुभवली.