जनतेज न्युज

वाकाईवाडी ओढ्यावरील साकव धोकादायक, जीव धोक्यात घालून ग्रामस्थांचा प्रवास

प्रतिनिधी, सांगली : शिराळा तालुक्यात सर्वत्र रस्त्याच्या सोयी सुविधा निर्माण झाल्या आहेत. मात्र अद्याप डफळेवाडी ता. शिराळा येथील लोकांना अजूनही जीव धोक्यात घालून मोडकळीस आलेल्या लाकडी साकवावरून प्रवास करावा लागत आहे.

येथील धोकादायक स्थितीमुळे ग्रामस्थांवर एक किलोमीटरच्या अंतरासाठी चार किलोमीटरची पायपीट करण्याची वेळ येत आहे.डफळेवाडी ते वाकाईवाडी दरम्यानच्या ओढ्यावरील लाकडी साकव मोडकळीस आला आहे. यामुळे शालेय मुलांना एक किलोमीटरवरील वाकाईवाडी येथील जवळची शाळा सोडून चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पनुंबरे वारूण येथील शाळेत जावे लागत आहे.डफळेवाडी डोंगराच्या पायथ्याशी ही दीडशे लोक वस्तीची वाडी आहे. येथे शाळा दुकान गिरण दूध संस्था नसल्याने येथील लोकांना साधी काडीपेटीही खरेदीसाठी एक किलोमीटर अंतरावरील वाकाईवाडी येथे जावे लागते. पायवाटेने डोंगरातून चालत जावे लागते. वाटेतील ओढ्यावर ग्रामस्थांनी स्वखर्चाने लाकडी साकव केला आहे. सध्या तो मोडकळीस आला आहे. त्यामुळे येथून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. सध्या पावसामुळे ओड्याला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने पाण्यातून जाता येत नाही. यामुळे जीवनावश्यक वस्तूसाठी चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पणुंब्रेवारूण पर्यंत पायपीट करावी लागते. मुलांना शाळेसाठी किराणामाल व दूध घालण्यासाठी दररोज जावे लागते. सध्या पाऊस व साकवच्या दुरावस्थेमुळे मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर लोखंडी साकव बसवावा अशी मागणी होत आहे.