जनतेज न्युज

महाराष्ट्राचा एवढा अवमान कधीही झाले नाही – जयंत पाटील

प्रतिनिधी, सांगली : घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तींनी अत्यंत जपून बोलण्याचा संकेत या देशातील सार्वजनिक जीवनात आहे. मात्र, काही महामहिम व्यक्तींनी त्यांच्या दिल्लीतील बॉसना खुश करण्याचा चांगलाच चंग बांधलेला दिसत आहे.
परराज्यातील व्यक्तींमुळे मुंबईत पैसा नसून या राज्यातील मराठी कष्टकऱ्यांच्या कष्टावर मुंबई उभी आहे. दुसऱ्या राज्यांबद्दल प्रेम असणाऱ्या व्यक्तींनी खुशाल तिकडे जाऊन रहावे.
सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अवमानकारक उदगार काढल्यानंतर ही महाराष्ट्रने संयम दाखवला होता. आता मात्र महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये आणि महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये मराठी माणसांचा हात नाही अशा पद्धतीचे उदगार काढणं हे राज्यपाल महोदयांना शोभतं का?
राज्यपाल महोदय म्हणून आम्ही किती दिवस संयम बाळगायचा. या महाराष्ट्राचा एवढा अवमान कधीही झाला नाही आणि महाराष्ट्र फक्त बघ्याची भूमिका घेत आहे हे दुर्देव आहे.
नवं सरकार नव्या सरकारचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या झालेला या अपमानाचा जाब कसा विचारणार आणि त्याला कसे उत्तर देणार हे पाहावे लागेल. मुंबई ज्यांच्या जीवावर उभी राहिली त्या मराठी माणसांच्या कष्टावर राज्यपालांनी अशा पद्धतीने वक्तव्य करून शंका व्यक्त केली आहे. महाराष्ट्राचा मोठा अपमान आहे.
महाराष्ट्राच्या राजधानीत पंचतारांकित व्यवस्थेत राहून महाराष्ट्रातील मराठी माणसांचा अपमान मा. राज्यपाल महोदय करत आहेत. महाराष्ट्र भाजपाला हे विधान मान्य आहे का ? राज्यपाल महोदय मराठी माणूस, महाराष्ट्राचा गौरवशाली व जाज्वल्य इतिहास यांचा वारंवार का अपमान करत आहेत ?