प्रतिनिधी, मुंबई : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निम्मित आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अण्णा भाऊ यांच्या घाटकोपर येथिल घराला भेट दिली. गेले अनेक वर्षे या घराच्या ठिकाणी अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक व्हावे ही मागणी आहे. या बाबत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना घोषणा केली होती. मात्र या स्मारकाबाबत पुढे काही ही हालचाली झाल्या नाहीत. मात्र काही दिवसांपूर्वी आमदार दिलीप लांडे यांच्यासह अण्णा भाऊ यांचे नातेवाईक आणि मातंग समाजाच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या स्मारकाचे कार्य मार्गी लावण्याची मागणी केली होती. या अनुषंगाने आज मुख्यमंत्री यांनी घाटकोपर च्या चिराग नगर मधील अण्णा भाऊ यांच्या घराची पाहणी केली. तसेच या ठिकाणी सुरू असलेल्या साहसी खेळांचा आस्वाद ही घेतला. स्वतः मुख्यमंत्री यांनी या घराची पाहणी केल्याने आता या स्मारकाचा मुद्दा लवकरात लवकर मार्गी लागेल अशी आशा त्यांचे नातेवाईक आणि आमदारांनी व्यक्त केली आहे.
