जनतेज न्युज

आहेरवाडी खून खटल्यात चार आरोपींना जन्मठेप

प्रतिनिधी, सोलापूर : शेतजमिनीच्या वाटणीच्या वादामध्ये विरोधात भूमिका घेतल्याने चुलत भावावर बंदुकीने गोळी झाडून त्याचा खून केल्याबद्दल तीन सख्या भावांसह चौघा आरोपींना सोलापूरच्या सत्र न्यायालयाने दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तसेच मृताच्या चार वारसदारांना प्रत्येकी दोन लाख रूपयांप्रमाणे आठ लाख रूपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश पारित केला आहे. 
दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरीवाडीतील खून प्रकरणात बशरणप्पा  दिंडोरे, त्याचे वडील शिवानंद  दिंडोरे, बसवराज महादेव दिंडोरे आणि सिध्दाराम  दिंडोरे अशी या  आरोपींची नावे आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश रेखा पांढरे यांनी या खटल्याचा निकाल सुनावला आहे.
 
यातील मृत मल्लिकार्जुन  दिंडोरे यांची बहीण भागिरथी आणि आरोपी शरणप्पा आणि इतरांमध्ये शेतजमिनीचा वाटणीचा वाद होता.
बहिण भागिरथी हिच्या हिश्याला येणारी शेतजमीन देण्यास आरोपी टाळाटाळ करीत होते.
तेव्हा या वादात मृत मल्लिकार्जुन दिंडोरे यांनी बहिणीच्या बाजूने हस्तक्षेप करून वाद मिटविला होता.
परंतु हा वाद आमच्या परस्पर का मिटविला, असा सवाल करीत आरोपींनी मृत मल्लिकार्जुन यांच्याशी वाद घातला.
१९ मार्च २०१७ रोजी मृत मल्लिकार्जुन दिंडोरे हे आपल्या वस्तीवर आपले बंधू मधुकर आणि इतरांशी गप्पा मारत थांबले होते.
तेव्हा आरोपी शरणप्पा दिंडोरे हा त्याचे वडील आणि चुलत्यांसह दुचाकीने तेथे आला.
त्याने शेतजमिनीच्या वाटणीचा वाद आमच्या परस्पर कसा मिटविला, याचा जाब विचारत भांडण काढले आणि सोबत आणलेल्या बंदुकीने मल्लिकार्जुन यांच्यावर गोळी झाडली.
बंदुकीची गोळी त्यांच्या डोक्यात कवटीत शिरल्यामुळे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. वळसंग पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद होऊन पोलिसांनी तपासाअंती आरोपींविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.