जनतेज न्युज

सुटाळा खुर्द येथे पारंपारिक पद्धतीने ‘बैलपोळा’ उत्साहात साजरा

प्रतिनिधी, बुलडाणा : श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जाणारा सर्जा राजाचा ‘पोळा’ हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गेल्या तीन वर्षानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी पोळा सण साजरा केला. खामगांव तालुक्यातील सुटाळा खुर्द येथे गेल्या अनेक वर्षापासुन पारंपारिक पद्धतीने आर.बी.देशमुख व महादेव पाटील यांच्या घरची गुडी ची संपूर्ण गावातून गाजावाजात मिरवणूक काढण्यात येते व त्यानंतर बैलपोळ्याला सुरुवात करण्यात येते.अल्प पाऊस,पीक परिस्थतीही फारशी समाधानकारक नसताना शेतक-यांनी शेतात राब-राब राबणारा तसेच आपला खराखुरा सोबती असलेल्या वृषभराजाचा पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला.
सण साजरा करताना पोळ्याच्या आदल्या दिवशी त्यांना नदीवर किंवा ओढ्यावर नेवून आंघोळ घालतात. या दिवशी बैलांच्या खांद्याला हळद व तुपाने किंवा तेलाने शेकतात. पोळ्याच्या दिवशी बैलांना कामापासून विश्रांती देण्यात येते. या दिवशी बैलांना काठीने मारत नाहीत तर त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा,नवी वेसण,नवा कासरा आवरायची दोरी,पायात चांदीचे किंवा करदोड्याचे तोडे घालतात. त्यानंतर त्यांना सायंकाळी पोळ्यात घेऊन गावातील पारावर घेऊन जातात व आंब्याचे तोरण बांधून गावातील सर्व बैलांची शर्यत होते तर यामध्ये सुटाळा खुर्द येथील सुरेश वेरुळकर यांच्या बैलाला मान दिला होता व त्यानंतर तोरण तोडून बैल शर्यतीला सुरुवात करण्यात आला. ग्रामीण भागातील महिला सकाळपासून पोळा सण साजरा करतात यामध्ये पुरणपोळी वडे भजे कुरड्या सांडोळ्या अशाप्रकारे घरोघरी महिला बैलांसाठी पंचपक्वान्न करतात व सायंकाळी पुण्यातून बैल घरी आल्यानंतर बैलांची पूजा अर्चना करून बैलांना नैवेद्य देतात व दर्शन घेतात