प्रतिनिधी, ठाणे : गेले काही दिवसात ठाणे पूर्व कोपरी विभागात सोनसाखळी चोरीच्या अनेक घटना घडल्याने कोपरी पोलिसांची डोकेदुखी वाढली होती. त्यातच दिनांक पाच ऑगस्ट 2022 रोजी चंदनी कोळीवाडा कुंभारवाडा येथे सायंकाळी चारच्या दरम्यान दोन अज्ञात चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेला धक्काबुक्की करा तिच्या गळ्यातली सोनसाखळी बळजबरीने पळवून नेली. परिमंडळ 500 पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरी पोलिसांनी शोध पथके तयार करून चोरट्यांचा शोध सुरू केला असता सदर टोळीतील प्रतीक दत्तात्रय सितारपराव उर्फ भावड्या हा 22 वर्षीय साखळी चोर राबोडी परिसरात लपून असल्याची गुप्त माहिती पोलिसांच्या हाती लागली.
प्रतीक याला ताब्यात घेताच त्याने आपला सहकारी रोहित रमेश चौबे यांच्या साथीने सदर गुन्हा केल्याचे कबूल केले. कोपरी पोलिसांनी तात्काळ चौबेला तीन हात नाका ठाणे परिसरातून अटक केली. चौबे याने आपले साथीदार सागर वाघ व दिनेश वाघ यांच्या सोबतीने ठाणे परिसरात अनेक सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली देताच पोलिसांनी दोन्ही वाघ बंधूना ताब्यात घेतले. या टोळक्याने चोरलेला ऐवज विल्हेवाट लावण्यासाठी वसीम मकानदार आणि पूर्णचंद्र मैती यांच्याकडे सोपाविल्याचे मान्य करताच पोलिसांनी सर्व आरोपी आणि मुद्देमाल ताब्यात घेतला. कोपरी पोलिसांनी चमकदार कामगिरी करत 8 जबरी चोऱ्या व एक मोटारसायकल असा एकूण ₹४,८०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
