प्रतिनिधी , पंढरपूर : कर्नाटक येथून टेंभुर्णीकडे गुटखा घेऊन जाणारा ट्रक अहिल्यादेवी पूलाजवळ पकडला असून यामध्ये ३4 लाख पन्नास हजार रुपयाचा गुटखा व 10 लाख रुपयांची ट्रक एकूण 44 लाख रुपयाचा मुद्दे माल असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली. कर्नाटक मधून आलेला लाखो रुपयांचा गुटखा सांगोला मार्गाने पंढरपूर शहरातील अहिल्या पूला जवळील रस्त्यावरून जात असल्याची माहिती सपोनी सी व्ही केंद्रे यांना यांना मिळाली. तत्काळ त्यांनी ही माहिती उप विभागीय पोलिस अधीक्षक विक्रम कदम, पोलीस निरीक्षक अरुण पवार यांना सांगून सपोनी सी व्ही केंद्रे यांनी संबंधित ठिकाणी भेट दिली. यावेळी एम एच ०९ सी ए ३६३० या क्रमांकाचा ट्रक संशयितरित्या जात असताना दिसून आला. त्यास अडवून तपासणी केली असता त्यामध्ये गुटख्याची पोती मिळून आली. त्याचबरोबर ट्रक चालक प्रकाश रेवाप्पा शेजाळे ( वय २१, भीमा तेलगाव, ता. दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर) याने हा गुटखा कर्नाटकातून आणल्याचे सांगितले.पोलिसांनी ट्रक व ट्रकचालकास ताब्यात घेतले असून याबाबतची माहिती अन्न औषध प्रशासनाला कळविले आहे.
