जनतेज न्युज

महिला पोलिस कर्मचाऱ्यांची दिवाळी कर्तव्यावरच ; लोहारा महिला पोलीस ठाण्यात कर्तव्याला प्राधान्य

प्रतिनिधी, यवतमाळ : पोलिस दलाला शिस्तीचे खाते म्हणून ओळखले जाते. त्यातच दिवाळी हा खास महिलांसाठी प्रकाशपर्वाचा सण आहे. महिला पोलिस कर्मचाऱ्यांची दिवाळी कर्तव्यावरच साजरी होणार आहे. यवतमाळ येथील लोहारा पोलिस ठाण्यात सर्व महिला पोलिस अधिकारी आणि कर्मचारी आहेत. त्यामुळे त्यांना रजा न घेता आपले कर्तव्य पार पाडावे लागणार आहे.

यवतमाळ जिल्ह्यात लोहारा पोलीस ठाण्याचा सर्व करभार महिलाच सांभारळतात. अगदी आरोपीला अटक करण्यापासून तर घटनेचा पंचनामा, रात्र गस्त देखील महिला पोलिसांना घालावी लागते. सगळीकडे दिवाळी सणाचा उत्साह दिसून येत आहे.खासकरून महिला वर्ग घराची साफसफाई करण्यापासून तर गोडधोड पदार्थ बनवण्यात व्यस्त आहे. त्याला लोहारा पोलिस ठाण्यातील महिला कर्मचारी अपवाद ठरत आहे. कर्तव्याला प्राधान्य देत महिलांची दिवाळी पोलिस ठाण्यात साजरी केली जाणार आहे. एकीकडे कौटुंबिक जबाबदारी आणि दुसरीकडे कर्तव्य बजावताना महिलांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे आम्ही ज्यावेळी खात्यात रुजू झालो, त्यावेळीच आमची दिवाळी, दसरा, होळी हे सण पोलिस ठाण्यात साजरे होणार याची जाणीव होती, त्यामुळे जनतेला कुटुंब मानून सर्व सण साजरे केले जात असल्याचे महिला पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.