जनतेज न्युज

मोबाईलच्या युगात लोप पावत चाललेली बहुरूपी ची कला जिवंत ठेवण्यासाठी जातिवंत कलाकारांची कसरत

प्रतिनिधी, औरंगाबाद : मोबाईल सारख्या मनोरंजनाच्या साधनाच्या काळात आपले दुख विसरून प्राचीन शिवकालीन बहुरूप्याची कला जिवंत ठेवणारे कलावंत आजही उपेक्षित असल्याचे सिल्लोड तालुक्यात समोर आले आहे. अंगात पोलिसांची वर्दी, हातात खेळण्यातील बंदूक, डोक्यावर टोपी, कमरेला पोलीस पट्टा, तोंडात शिट्टी आणि खांद्याला अडकवलेली व प्रमाणपत्रांनी भरलेली फाटकी पिशवी तसेच काळा कोट घालून वकिली पोशाख हे चित्र आहे. मोहन सावंत व शिवराम शिंदे या बहुरूपी कलाकाराचे. महाराष्ट्रात विविध प्रकारचे लोककलावंत आहेत. बहुरूपी हा त्यातीलच एक प्रकार. हे कलाकार कोणाचीही हुबेहूब नक्कल करून सर्वांना आनंद देऊन आपली उपजीविका भागवतात. यामध्ये प्रामुख्याने फौजदार, वकील यांचे वेष धारण करून सिल्लोड शहरासह तालुक्यात गावोगावी फिरून आपल्या संसाराचा गाडा हाकतात. मात्र आज या बहुरूपी कलावंतांचे पोटापाण्याचे हाल होताना दिसत आहेत.
मोबाईलच्या रूपानं करमणुकीची साधनं थेट हातात आल्यामुळे बहुरूपी कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. पोलिसांच्या वेशात येणाऱ्या या कलावंतांना भामटे व फसवेगिरी करणारे लोक समजून त्यांना जनतेच्या रोषाला देखील अनेकदा सामोरे जावे लागते. निरनिराळी सोंगं करणारी ही बहुरूपी जमात आता काळाच्या ओघात लुप्त होत असल्याचे पहावयास मिळत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने संपूर्ण घडी विस्कटून गेली आहे. सामान्य माणसांचे जगणे मुश्किल बनले आहे. उद्योग व्यवसाय मोडकळीस आलेले आहेत. त्यातच हाताला काम नसल्याने बेकारीसुद्धा वाढली आहे. कलाकारांचे हाल तर त्याहून अधिक खराब बनले आहेत. ग्रामीण भागातील कलाकार आता शहरी भागात आपली कला सादर करून उपजीविका करू लागले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील चांदा येथील बहुरूपी कलाकार मोहन सावंत व शिवराम शिंदे हे सध्या सिल्लोड शहरासह तालुक्यात गल्लोगल्ली फिरून आपली सादर करून लोकांची करमणूक करत उपजीविकेसाठी धडपडत आहेत. त्यांच्या तोंडून बाहेर पडणारी धमाल कॉमेडी सर्वांचे मनोरंजन करते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासुन त्याकाळी बहीरजी नाईक पासुन आलेली वासुदेव,गोंधळी,डोंबारी,बहुरूपी हि कला ग्रामीण भागात आज ही जोपासली जात असताना मात्र
भूमिहीन असलेले मोहन सावंत व शिवराम शिंदे याना कुटुंबाचा प्रपंच चालविताना जगण्याची कसरत करावी लागत आहे. वर्षोनुवर्षे बहुरूपी म्हणून जनतेला निखळ आनंद देणारे बहुरूपी कलाकार शासनाच्या सवलतींपासून वंचित असल्याचे समोर येत आहे. आता तरी मायबाप सरकारने आमच्याकडे लक्ष देण्याची अपेक्षा हे उपेक्षित कलावंत करीत आहे .