प्रतिनिधी , धुळे : चोरीच्या मोटारसायकलने मंदिरात जावून मंदिरातील ऐवज चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात धुळे शहर उपविभाग पोलीस ठाण्याच्या शोध पथकाला यश आले आहे. विशेष म्हणजे शोध पथकाने अवघ्या २४ तासात या चोरीचा उलगडा केला. या कारवाईत चोरीच्या मोटारसायकल सह मंदिरातून चोरीस गेलेला मुद्देमालही चोरट्यांकडून हस्तगत करण्यात आला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, धुळे शहरातील दसेरा मैदान चौकात मित्तल इंडस्ट्रिज वॉल कंपाउंडमध्ये असलेल्या शिवशंकर मंदिरात काल पहाटे चोरी झाली होती. चोरट्यांनी मंदिराच्या दरवाजाच्या कुलूपाची कडी, कोयंडा तोडून मंदिरातील १५०० रुपये किमतीची गजानन महाराजांची पितळी मूर्ती, पितळी घोडा व रोख चिल्लर असा ऐवज चोरुन नेला होता. याप्रकरणी मंदिराचे पुजारी भगवान तुकाराम गुरव रा. रामवाडी यांच्या फिर्यादीवरुन धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुसरीकडे मोहाडी येथील वठ्ठल मंदिराजवळ राहणारे समाधान भिमराव बागुल (२२) यांची मोटारसायकलही परवा चोरीस गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी त्यांनी चाळीसगांव रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने गुन्हा दाखल झाला होता. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास दोन्ही पोलिस ठाण्यांकडून सुरु होता, मंदिरातील चोरी व मोटारसायकलच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलीसांच्या हाती महत्वाची माहिती लागली. चोरी केलेल्या मोटारसायकलचाच वापर करून त्याच चोरट्यांनी मंदिरात चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याच्या शोध पथकाने समधान बागुल यांची चोरीस गेलेली मोटारसायकल हुडकून काढली. मोटारसायकल वरील कपील अहमद शकील अहमद अन्सारी (२६) रा. इकबाल रोड, मौलवीगंज, धुळे, सुदेश मोहम्मद सलीम अन्सारी (२२) रा. वडजाईरोड, धुळे यांना पथकाने ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडून ३५ हजार रुपये किमतीच्या मोटारसायकलसह मंदिरातून चोरीस गेलेला मुद्देमालही जप्त करण्यात आला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड तसेच सहायक पोलीस अधिक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर पोलिस, चाळीसगाव रोड पोलिस आणि मोहाडी पोलीस स्टेशन यांनी संयुक्तरित्या केली आहे.या कारवाई नंतर सहायक पोलीस अधिक्षक ऋषिकेश रेड्डी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांच्या मार्गदर्शनात आम्ही धुळे शहर उपविभागात कालपासून एक बदल केला आहे. शहरांतर्गत असलेल्या विविध ७ पोलीस ठाण्यांचे शोध पथक आता केवळ त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीपूरताच काम करणार नाही, तर ते शहरात कुठेही घडणाऱ्या गुन्ह्यासाठी जबाबदार असतील. त्यासाठी शहर उपविभागातील सर्वच शोध पथक कर्मचाऱ्यांचे प्रत्येकी ७ याप्रमाणे ग्रुप तयार केले आहेत. हा सात जणांचा ग्रुप विविध पोलीस ठाण्यात जावून तेथील पीआयला तपासकामी मदत करेल यामुळे तपास यंत्रणा आणखी स्ट्रॉंग होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
