जनतेज न्युज

रब्बी पीक स्पर्धा शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाची बक्षीस योजना

प्रतिनिधी: पिकांच्या उत्पादकतेत वाढ व्हावी, प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या वतीने रब्बी पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पिकांचे उत्पादन वाढवा अन् हजारांचे बक्षीस मिळवा, अशी कृषी विभागाची ही योजना आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. सतत तीन वर्षे सातत्याने तेच पीक घ्यावे लागत होते. मात्र नैसर्गिक आपत्ती व इतर कारणामुळे होणारी उत्पादकतेतील घट शेतकऱ्यांना नाउमेद करत होती, आता ही स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यात येत आहे. यासाठी तालुका, जिल्हा राज्य पातळीवर बक्षीस दिले जाणार आहे. यातून नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर होण्यास मदत होणार असून शेतकऱ्यांची इच्छाशक्ती, मनोवल वाढविणार आहे. तालुका पातळीवर पहिले बक्षीस 5 हजार, दुसरे 3 हजार तर तिसरे 2 हजार आहे. जिल्हा पातळीवर पहिले 10 हजार, दुसरे 7 हजार, तर तिसरे 5 हजार रुपये आहे. या योजनेचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.