प्रतिनिधी , सोलापूर : भारतीय खाद्य निगमच्या अंतर्गत सोलापूर येथील एफ. सी. आय. डेपो येथे लवकरच सायलो (SILO) धान्य कोठाराची निर्मिती करण्यात येणार आहे. ज्यामध्ये 25 लाख मेट्रिक टन धान्याची वैज्ञानिक पद्धतीने साठवणूक करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय खाद्य निगमच्या विभागीय व्यवस्थापक मनीषा मीना यांनी दिली आहे. केंद्र सरकारच्या भारतीय खाद्य निगम या महत्वपूर्ण महामंडळाचे महाराष्ट्र राज्यात आठ विभागीय कार्यालय असून या अंतर्गत 91 धान्य गोदाम असून ज्याची साठावणूक क्षमता ही 19.75 लाख मेट्रिक टन आहे. ज्यामध्ये वैज्ञानिक पद्धतीने धान्याची साठवणूक केली जाते. महाराष्ट्रात प्रतिमाह सात करोड पेक्षा जास्त लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अन्नधान्य सुरक्षा योजनेअंतर्गत अन्नधान्याचा पुरवठा या माध्यमातून केला जातो. भारतीय खाद्य निगम ने आपल्या कार्यप्रणालीमध्ये आधुनिकीकरणावर भर देत राज्यात केंद्र सरकार आणि महामंडळाच्या माध्यमातून 19 ठिकाणी 13.25 लाख मेट्रिक टन सायलो (SILO ) धान्य कोठाराच्या निर्माती चे उद्देश ठेवले आहे. सोलापुर डेपोत देखील सायलो धान्य कोठाराची निर्मिती होणार असून त्यामध्यमातून 25 लाख मेट्रिक टन धान्याची वैज्ञानिक पद्धतीने साठवणूक होणार असल्याची माहिती विभागीय व्यवस्थापक मनीषा मीना यांनी दिली आहे.
